अवघ्या ४१ चेंडूंत विंडीजचा फडशा; ऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश

एकदिवसीय क्रिकेटमधील हा सहाव्या क्रमांकाचा सर्वात कमी चेंडूंत निकाली लागलेला सामना ठरला.
अवघ्या ४१ चेंडूंत विंडीजचा फडशा; ऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश

कॅनबेरा : वेगवान गोलंदाज झेव्हियर बार्टलेटने २१ धावांत मिळवलेल्या ४ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी व तब्बल २५९ चेंडू राखून विजय मिळवत वेस्ट इंडिजची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाने ८७ धावांचे लक्ष्य ४१ चेंडूंत गाठून मायदेशातील सर्वात वेगवान विजय नोंदवला. याबरोबरच कांगारूंनी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा संघ २४.१ षटकांत ८६ धावांत गारद झाला. अलिक अथान्झेने त्यांच्याकडून सर्वाधिक ३२ धावा केल्या. आठ फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. त्यानंतर जेक फ्रसर (१८ चेंडूंत ४१) व जोश इंग्लिस (१६ चेंडूंत नाबाद ३५) यांनी २७ चेंडूंतच ६७ धावांची सलामी नोंदवली. मग कर्णधार स्टीव्ह स्मिथने (३ चेंडूंत नाबाद ६) सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयी चौकार लगावला. बार्टलेटला सामनावीरसह तीन लढतींमध्ये सर्वाधिक ८ बळी मिळवल्याने मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला.

ही लढत फक्त १८६ चेंडूंत (विंडीजचे १४५, ऑस्ट्रेलियाचे ४१) निकाली ठरली. ऑस्ट्रेलियाने मायदेशात प्रथमच इतक्या कमी चेंडूंत एखादा सामना जिंकला. यापूर्वी २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाने विंडीजविरुद्धच १९९ चेंडूंत विजय मिळवला होता.

एकदिवसीय क्रिकेटमधील हा सहाव्या क्रमांकाचा सर्वात कमी चेंडूंत निकाली लागलेला सामना ठरला. तसेच विंडीजने प्रथमच २५९ चेंडूंच्या फरकाने एखादा एकदिवसीय सामना गमावला.

logo
marathi.freepressjournal.in