ऑस्ट्रेलिया यंदा भारताला ३-१ अशा फरकाने नमवणार : पाँटिंग

ऑस्ट्रेलिया यंदा भारताला बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने नमवेल, असे भाकीत कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने वर्तवले आहे.
ऑस्ट्रेलिया यंदा भारताला ३-१ अशा फरकाने नमवणार : पाँटिंग
Published on

सिडनी : ऑस्ट्रेलिया यंदा भारताला बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने नमवेल, असे भाकीत कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने वर्तवले आहे. तसेच मोहम्मद शमीची अनुपस्थितीत भारताला प्रकर्षाने जाणवेल, असेही पाँटिंगने सांगितले.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी ही मालिका खेळवण्यात येते. गेल्या दशकभरापासून ऑस्ट्रेलियाला भारताला नमवणे जमलेले नाही. मात्र भारताने नुकताच न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच ०-३ असा दारुण पराभव पत्करला. त्यामुळे याचा लाभ ऑस्ट्रेलियन संघ घेईल, असे पाँटिंगला वाटते.

“जसप्रीत बुमरा भारतासह सध्या विश्वातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे, यात शंका नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला नमवण्यासाठी बुमरा एकटा पुरेसा ठरणार नाही. शमीची अनुपस्थिती भारतासाठी मोठा फटका आहे. कसोटी जिंकण्यासाठी तुम्हाला २० बळी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला यंदा मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे,” असे पाँटिंग म्हणाला.

“न्यूझीलंडविरुद्ध भारताचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची कसोटी लागेल. भारताने यापूर्वीही अनेकदा झोकात पुनरागमन केले आहे. मात्र यावेळी त्यांना तसे करणे सोपे नसेल. गोलंदाजाची फळी सक्षम नसल्यास भारताला संघर्ष करावा लागेल,” असेही पाँटिंगने नमूद केले.

भारतावर अधिक दडपण : गिलख्रिस्ट

मायदेशातील कसोटी मालिकेत सपशेल अपयश आल्याने भारतीय संघ आता दडपणाखाली असेल. भारताचे खेळाडू मानसिकदृष्ट्या खचले असतील. याचा ऑस्ट्रेलियन संघाला आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेत फायदा होऊ शकेल, असे मत माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्टने मांडले.

“मायदेशातील कसोटी मालिका अशाप्रकारे गमावणे हा भारतासाठी निश्चित मोठा धक्का असेल. त्यांचे खेळाडू आता दडपणाखाली असतील. तसेच ते स्वत:ला बरेच अवघड प्रश्न विचारत असतील. ऑस्ट्रेलिया त्यांना सहजपणे पराभूत करेल असे नाही. मात्र, भारतीय खेळाडू मानसिकदृष्ट्या काही प्रमाणात खचले असतील. भारताने याआधी कसोटी मालिका कधी गमावली होती हे मला आठवतही नाही. आता तर त्यांना मालिकेतील तीनही सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर बरेच प्रश्न उभे राहिले आहेत,” असे ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक गिलख्रिस्टने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in