रसेल-रुदरफोर्डचा रुद्रावतार, सहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी; विंडीजची ऑस्ट्रेलियावर ३७ धावांनी सरशी

पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने पहिले दोन लढती जिंकल्यामुळे मालिकेत २-१ असे यश संपादन केले.
रसेल-रुदरफोर्डचा रुद्रावतार, सहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी; विंडीजची ऑस्ट्रेलियावर ३७ धावांनी सरशी

पर्थ : आंद्रे रसेल (२९ चेंडूंत ७१ धावा) आणि शर्फेन रुदरफोर्ड (४० चेंडूंत नाबाद ६७ धावा) या दोघांचा रुद्रावतार मंगळवारी चाहत्यांना पाहायला मिळाला. रसेल व रुदरफोर्डने सहाव्या विकेटसाठी ६६ चेंडूंतच रचलेल्या १३९ धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीच्या बळावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३७ धावांनी पराभव केला. मात्र या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने पहिले दोन लढती जिंकल्यामुळे मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना विंडीजने २० षटकांत ६ बाद २२० धावांचा डोंगर उभारला. रसेलने ४ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी केली, तर रुदरफोर्डने प्रत्येकी ५ चौकार व ५ षटकार लगावले. ५ बाद ७९ धावांवरून या दोघांनी १३९ धावांची भागीदारी रचली. रॉस्टन चेसने ३७ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ५ बाद १८३ धावांपर्यंतच मजल मारता आली. डेव्हिड वॉर्नरने ४९ चेंडूंत ८१ धावा फटकावताना ९ चौकार व ३ षटकार लगावले. तसेच टिम डेव्हिडने १९ चेंडूंतच नाबाद ४१ धावा फटकावल्या. मात्र ग्लेन मॅक्सवेल (१२), कर्णधार मिचेल मार्श (१७), जोश इंग्लिस (१) यावेळी अपयशी ठरल्याने कांगारूंना पराभव पत्करावा लागला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in