ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाचे विंडीजवर तीन दिवसांतच वर्चस्व

ॲडलेड येथे झालेल्या या कसोटीत गुरुवारच्या ६ बाद ७३ धावांवरून पुढे खेळताना हेझलवूडसमोर विंडीजचा फार काळ निभाव लागू शकला नाही
ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाचे विंडीजवर तीन दिवसांतच वर्चस्व

ॲडलेड : जोश हेझलवूडने (३५ धावांत ५ बळी) दुसऱ्या डावातही प्रभावी गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव १२० धावांतच गुंडाळला. त्यानंतर माफक २६ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता गाठून विंडीजवर पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशीच १० गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह कांगारूंनी दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील दुसरी कसोटी २५ जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येईल.

ॲडलेड येथे झालेल्या या कसोटीत गुरुवारच्या ६ बाद ७३ धावांवरून पुढे खेळताना हेझलवूडसमोर विंडीजचा फार काळ निभाव लागू शकला नाही. त्यामुळे ३५.२ षटकांत त्यांचा संघ १२० धावांत गारद झाला. हेझलवूडने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना सामन्यात एकूण ९ बळी पटकावले. मिचेल स्टार्क व नॅथन लायन यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी दोन बळी मिळवले.

त्यानंतर स्टीव्ह स्मिथ (नाबाद ११) व मार्नस लबूशेन (नाबाद १) यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उस्मान ख्वाजा चेंडू लागल्याने जायबंदी होऊन तो ९ धावांवर माघारी परतला. विंडीजकडून या लढतीत पदार्पणवीर शमार जोसेफने चांगली कामगिरी करताना पहिल्या डावात ५ बळी मिळवले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून ११९ धावांची खेळी साकारणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

हेझलवूडने कसोटी कारकीर्दीत ११व्या डावात पाच बळी मिळवले. ६७ कसोटींमध्ये त्याच्या नावावर २५८ बळी जमा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in