ऑस्ट्रेलियाचा इंग्लिस तारणहार; इंग्लंडची हार

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शनिवारी यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस ऑस्ट्रेलियाचा तारणहार म्हणून उदयास आला.
ऑस्ट्रेलियाचा इंग्लिस तारणहार; इंग्लंडची हार
ऑस्ट्रेलियाचा इंग्लिस तारणहार; इंग्लंडची हारX - @ICC
Published on

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शनिवारी यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस ऑस्ट्रेलियाचा तारणहार म्हणून उदयास आला. इंग्लिसने ८६ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १२० धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडवर ५ गडी आणि १५ चेंडू राखून विजय मिळवला.

ब-गटातील या लढतीत इंग्लंडने दिलेले ३५२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. इंग्लिसने ७७ चेंडूंत शतक झळकावताना चॅम्पियन्स ट्रॉफीतील वेगवान शतकाचा मान मिळवला. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या सर्व स्पर्धांमधील आजवरचा सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम नोंदवला. पाकिस्तानने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध ३४५ धावांचा पाठलाग केला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने ३५२ धावांचे लक्ष्य गाठून अन्य संघांना इशारा दिला.

लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ३५१ धावांचा डोंगर उभारला. बेन डकेटने एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावताना १७ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. डकेटची ही कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने जो रूटसह तिसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचली. रूटने ४ चौकारांसह ७८ चेंडूंत ६८ धावा केल्या. मात्र मधली फळी ढेपाळल्याने इंग्लंडला किमान २५ ते ३० धावा कमी पडल्या. कर्णधार जोस बटलर (२३), जोफ्रा आर्चर (नाबाद २१) यांनी योगदान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (५), ट्रेव्हिस हेड (६) स्वस्तात माघारी परतले. मात्र मॅथ्यू शॉर्ट (६३) व मार्नस लबूशेन (४७) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली. आदिल रशिदने लबूशेनचा, तर लिव्हिंगस्टोनने शॉर्टचा अडसर दूर केला. ४ बाद १३६ अशा स्थितीतून मग इंग्लिस व ॲलेक्स कॅरी यांची जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल १४६ धावांची भागीदारी रचली. कॅरी ६९ धावांवर बाद झाला. मात्र इंग्लिसने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यानेच ४८व्या षटकात विजयी षटकार लगावला.

पाकिस्तानचे नाव वगळल्याने पीसीबीची नाराजी

भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान थेट प्रक्षेपणात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोगोतून यजमान देश पाकिस्तानचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) याविरोधात नाराजी व्यक्त केली असून आयसीसीला याविषयी पत्र लिहिले आहे. तसेच स्पष्टीकरण मागितले आहे. नियमांनुसार आयसीसी स्पर्धांमध्ये टीव्हीवर तसेच मोबाईल ॲपवरही सामना पाहणाऱ्यांना डाव्या कोपऱ्यात स्पर्धेच्या लोगोमध्ये यजमान देशाचे नाव दिसते. मात्र भारत-बांगलादेश लढतीदरम्यान ते दिसत नव्हते.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढतीत भारताचे राष्ट्रगीत

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी प्रथेप्रमाणे दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मात्र यावेळी पाकिस्तानच्या आयोजकांकडून मोठा घोळ झाला. इंग्लंडचे राष्ट्रगीत झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजवण्याऐवजी त्यांनी चुकून भारताचे राष्ट्रगीत सुरू केली. २-३ सेकंदांच्या अवधीतच हे गीत बंद करण्यात आले. मात्र यामुळे स्टेडियममधील प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. क्षणातच मग ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. मात्र यामुळे भारत तसेच ऑस्ट्रेलियाचा अपमान झाला असून पाकिस्तानच्या ढिसाळ आयोजनावर चाहते कडाडून टीका करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in