ऑस्ट्रेलियाचा विजय; मालिकेत बरोबरी, भारतावर ६ विकेट्स राखून मात

ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मंगळवारी रंगणाऱ्या तिसऱ्या सामन्यात मालिकेचा निकाल लागणार
ऑस्ट्रेलियाचा विजय; मालिकेत बरोबरी,
भारतावर ६ विकेट्स राखून मात
Published on

नवी मुंबई : गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनीही दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला ६ विकेट्स आणि ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मंगळवारी रंगणाऱ्या तिसऱ्या सामन्यात मालिकेचा निकाल लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने भारताला २० षटकांत ८ बाद १३० धावांवर रोखले. त्यानंतर १३१ धावांचे आव्हान पार करताना कर्णधार अलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भर घातली. मात्र आठव्या षटकांत अलिसा (२६) आणि दहाव्या षटकांत बेथ मूनी (२०) बाद झाल्यावर ताहिला मॅकग्रा आणि ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयाची पायाभरणी केली. मात्र ताहिला (१९) आणि ॲॅशले गार्डनर (७) झटपट बाद झाल्यावर पेरी हिने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

१८ चेंडूंत १९ धावांची आवश्यकता असताना पूजा वस्त्रकार हिने १८व्या षटकांत फक्त चार धावा देत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र श्रेयांका पाटील हिला फोएबे लिचफील्ड हिने चांगलाच चोप दिला. लिचफील्डने दोन तर पेरीने एक चौकार लगावत तब्बल १५ धावा चोपून काढत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, भारताच्या महिला फलंदाजांनी निराशा केली. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. मात्र दुसऱ्याच षटकांत शफाली वर्माला पायचीत पकडत किम गार्थने भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर गार्थने जेमिमा रॉड्रिग्जचा (१३) अडसर दूर केला. पाठोपाठ स्मृती मानधनाही (२३) माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौर (६) हिनेही सपेशल निराशा केली. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद ५४ अशी झाली होती.

रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ३७ धावांची भर घातली. मात्र जॉर्जिया वेअरहॅम हिने रिचा घोषला (२३) पायचीत पकडत ही जोडी फोडली. दीप्तीने अखेरपर्यंत किल्ला लढवला. मात्र तिला ५ चौकारांसह ३० धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला २० षटकांत ८ बाद १३० धावांपर्यंतच मजल मारता आली.

logo
marathi.freepressjournal.in