दिल्ली : स्मृती मानधनाने झळकावलेले महिला एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान शतक भारताच्या पराभवामुळे व्यर्थ गेले. शनिवारी ३ सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात विक्रमी धावांचा पाठलाग करताना भारताचा ४३ धावांनी पराभव झाला. विजयासह ऑस्ट्रेलियन महिला संघाने मालिकेत २-१ ने सरशी साधली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघ ४१२ धावांवर सर्वबाद झाला. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधनाच्या ६३ चेंडूंत १२५ धावांच्या (१७ चौकार आणि ५ षटकार) बळावर भारताला ४७षटकांत ३६९ धावांपर्यंत मजल मारता आली.
दिप्ती शर्मा (५८ चेंडूंत ७२ धावा) आणि स्नेह राणा या जोडीने आठव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केल्याने भारताच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र दिप्ती बाद झाल्यावर यजमानांचा संघ पराभवाच्या वाटेवर गेला.
बेथ मूनीने या सामन्याची स्टार फलंदाज ठरली. तिने ७५ चेंडूंत १३८ धावा फटकावत ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारून दिला. तिने तिसऱ्या विकेटसाठी अॅलिसा पेरीसोबत १०६ धावांची भागीदारी केली. अॅलिसा पेरीने ७० चेंडूंत ६८ धावा जमवल्या. सलामीवीर जॉर्गिया वॉलने ६१ चेंडूंत ८१ धावा करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली.
दरम्यान ३ सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामने जिंकले होते. त्यामुळे शनिवारी झालेल्या अखेरच्या लढतीतील विजेता संघ मालिका जिंकणार होता. अखेर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत मालिका विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघातील गोलंदाजांची धुलाई झाली. दोन्ही संघांतील फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांतील गोलंदाजांवर आक्रमण केले.
स्मृती मानधनाचे ५० चेंडूंत शतक
स्मृती मानधनाने अवघ्या ५० चेंडूत शतकी बॅट उंचावत ऑस्ट्रेलियाची माजी फलंदाज करेन रोल्टॉनचा ५७ चेंडूंतील शतकाचा विक्रम मोडीत काढला. तिने हा विक्रम २०००-०१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तिने २०१२-१३ च्या हंगामात न्यूझीलंडविरुद्ध ४५ चेंडूंत शतक झळकावले होते.