सिनेर सलग दुसऱ्यांदा अजिंक्य; ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या झ्वेरेव्हवर तीन सेटमध्ये वर्चस्व

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा : इटलीच्या अग्रमानांकित जॅनिक सिनेरने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लम टेनिस स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले.
सिनेर सलग दुसऱ्यांदा अजिंक्य; ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या झ्वेरेव्हवर तीन सेटमध्ये वर्चस्व
Published on

मेलबर्न : इटलीच्या अग्रमानांकित जॅनिक सिनेरने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लम टेनिस स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. गतविजेत्या सिनेरने अंतिम फेरीत जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला पराभूत करून कारकीर्दीतील एकंदर तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले.

२३ वर्षीय सिनेरने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात २७ वर्षीय झ्वेरेव्हला ६-३, ७-६ (७-४), ६-३ अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या या लढतीत सिनेरने २ तास आणि ४२ मिनिटांत सरशी साधली. ऑस्ट्रेलियन ओपन ही वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाते. हार्ड कोर्टवर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सिनेरला कार्लोस अल्कराझ, नोव्हाक जोकोव्हिच यांच्याकडून कडवी झुंज अपेक्षित होती. मात्र अल्कराझ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला, तर जोकोव्हिचने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यानंतर अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सिनेरने झ्वेरेव्हला दुसरा सेट वगळता सहज नेस्तनाबूत केले.

हार्ड कोर्टवरील सलग तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा सिनेर हा ओपन एरामधील पहिलाच खेळाडू ठरला. सिनेरने गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. आता जून महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये सिनेर क्ले कोर्टवरील पहिले जेतेपद मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

“ऑस्ट्रेलियन ओपनचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवणे स्वप्नवत आहे. माझ्या संपूर्ण चमूची यामागे मेहनत आहे. तसेच झ्वेरेव्हसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध असा विजय मिळवणे समाधानकारक आहे. पुढील स्पर्धांसाठी यानिमित्ताने आणखी प्रेरणा मिळेल,” असे सिनेर म्हणाला.

दरम्यान, महिला एकेरीत मॅडीसन कीझने अग्रमानांकित आर्यना सबालेंकाला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. कीझने उपांत्य फेरीत इगा स्विआटेकला धूळ चारली होती. कीझचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले, हे विशेष.

सिनेरने कारकीर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. त्याने गतवर्षी ऑस्ट्रेलियन तसेच अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. इटलीकडून सलग दोन ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिलाच ठरला.

logo
marathi.freepressjournal.in