ऑस्ट्रेलियन ओपन : अल्कराझ, सबालेंका, गॉफ, झ्वेरेव्ह यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश; चौथ्या दिवशी तारांकित खेळाडूंची विजयी घोडदौड

स्पेनचा कार्लोस अल्कराझ, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, बेलारूसची आर्यना सबालेंका आणि अमेरिकेची कोको गॉफ यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी तब्बल १ लाख ३ हजार ७२० जणांनी कोर्टवर उपस्थित राहून लढतींचा आनंद लुटला.
ऑस्ट्रेलियन ओपन : अल्कराझ, सबालेंका, गॉफ, झ्वेरेव्ह यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश; चौथ्या दिवशी तारांकित खेळाडूंची विजयी घोडदौड
Published on

मेलबर्न : स्पेनचा कार्लोस अल्कराझ, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, बेलारूसची आर्यना सबालेंका आणि अमेरिकेची कोको गॉफ यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी तब्बल १ लाख ३ हजार ७२० जणांनी कोर्टवर उपस्थित राहून लढतींचा आनंद लुटला.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या ११४व्या पर्वाला रविवारपासून प्रारंभ झाला. यंदा उद्घाटन सोहळ्यासाठी टेनिसच्या दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा म्हणून ऑस्ट्रेलियन ओपनला ओळखले जाते. यंदा १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. गतवर्षी या स्पर्धेत इटलीचा यॅनिक सिनर व अमेरिकेची मॅडीसन कीझ यांनी जेतेपद मिळवले होते. यंदा पुरुष एकेरीत अल्कराझ, तर महिलांमध्ये सबालेंका यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

दरम्यान, पुरुष एकेरीत अल्कराझने यॅनिक हफमॅनला ७-६ (७-४), ६-३, ६-२ अशी तीन सेटमध्ये धूळ चारली. तिसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने अलेक्झांडर मुलरला ६-३, ४-६, ६-३, ६-४ असे चार सेटमध्ये नमवले. अल्कराझला कारकीर्दीत फक्त ऑस्ट्रेलियन ओपनचेच जेतेपद खुणावत आहे. २०२४ व २०२५मध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. अन्य तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा अल्कराझने प्रत्येकी दोन वेळा जिंकल्या आहेत.

महिला एकेरीत अग्रमानांकित सबालेंकाने झोशुन बाईवर ६-३, ६-१ असे वर्चस्व गाजवले. सबालेंकाला सलग दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. २०२५च्या अखेरीस तिने अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले होते. अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित गॉफने ओल्गा डॅनिलोव्हिचला ६-२, ६-२ अशी धूळ चारली. सातवी मानांकित जास्मिन पाओलिनी व आठवी मानांकित मिरा आंद्रेव्हा यांनीदेखील तिसरी फेरी गाठली.

भारतीय खेळाडूंचा विचार करता एन. श्रीराम बालाजी पुरुष दुहेरीत, तर युकी भांब्री मिश्र दुहेरीत विदेशी सहकाऱ्यासह खेळताना दिसतील. रोहन बोपण्णा निवृत्त झाल्यामुळे तो यावेळी स्पर्धेचा भाग नाही.

logo
marathi.freepressjournal.in