मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मंगळवारी स्पेनचा कार्लोस अल्कराझ, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र अमेरिकेच्या कोको गॉफला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. तसेच नोव्हाक जोकोव्हिचच्या प्रतिस्पर्ध्याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने तो उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या ११४व्या पर्वाला रविवारपासून प्रारंभ झाला. यंदा उद्घाटन सोहळ्यासाठी टेनिसच्या दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा म्हणून ऑस्ट्रेलियन ओपनला ओळखले जाते. यंदा १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. गतवर्षी या स्पर्धेत इटलीचा यॅनिक सिनर व अमेरिकेची मॅडीसन कीझ यांनी जेतेपद मिळवले होते. यंदा पुरुष एकेरीत अल्कराझ, तर महिलांमध्ये सबालेंका यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
पुरुष एकेरीत अल्कराझने कॉर्टीन मॉटेटला, तर झ्वेरेव्हने कॅमेरून नॉरीला धूळ चारली. तसेच सबालेंकाने पोटापोव्हाला पराभूत केले, तर गॉफने बॅप्टीवर तीन सेटमध्ये मात केली. चौथ्या मानांकित जोकोव्हिचने फ्रान्सेस्को मास्ट्रेलीला ६-३, ६-२, ६-२ अशी धूळ चारली. ३८ वर्षीय जोकोव्हिचला कारकीर्दीतील २५वे ग्रँडस्लॅम खुणावत आहे. त्याने २०२३मध्ये अखेरचे ग्रँडस्लॅम जिंकले होते. आता जोकोव्हिचची वॅन डी झँडस्कल्पशी गाठ पडेल. ३१व्या मानांकित त्सित्सिपासला मात्र स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
दुसरीकडे ४० वर्षीय वावरिंकाने गीयावर ४-६, ६-३, ३-६, ७-५, ७-६ (१०-३) अशी पाच सेटमध्ये मात केली. तसेच इटलीच्या दुसऱ्या मानांकित यानिक सिनरने डकवर्थला ६-१, ६-४, ६-२ अशी धूळ चारली. नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झने, १२व्या मानांकित कॅस्पर रूडनेसुद्धा आगेकूच केली.
महिलांमध्ये १६वी मानांकित नाओमी ओसाका, दुसरी मानांकित इगा स्विआटेक यांनी तिसरी फेरी गाठली. स्विआटेकने बोझकावाला ६-२, ६-३ असे नेस्तनाबूत केले.