
मेलबर्न : बेलारूसची गतविजेती आर्यना सबालेंका आणि अमेरिकेची मॅडीसन कीझ यांच्यात शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या जेतेपदासाठी लढत रंगेल. सबालेंकाने गुरुवारी सलग तिसऱ्यांदा, तर कीझने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली.
वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात अग्रमानांकित सबालेंकाने स्पेनच्या ११व्या मानांकित पावलो बडोसाला ६-४, ६-२ अशी धूळ चारली. सबालेंकाने २०२३ व २०२४मध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे तिला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे.
दुसरीकडे २९ वर्षीय कीझने पोलंडच्या दुसऱ्या मानांकित इगा स्विआटेकचा प्रतिकार मोडीत काढताना तिच्यावर ५-७, ६-१, ७-६ (१०-८) अशी तीन सेटमध्ये सरशी साधली. तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये स्विआटेक एकवेळ ७-५ अशी आघाडीवर होती. मात्र तेथून १९व्या मानांकित कीझने विजय मिळवला. दुसरीकडे स्विआटेकला दुसऱ्यांदा या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.