ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा: जोकोव्हिचचे साम्राज्य खालसा; उपांत्य फेरीत पराभूत

२०१९पासून जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सत्ता प्रस्थापित करताना सलग ३३ सामने जिंकले होते.
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा: जोकोव्हिचचे साम्राज्य खालसा; उपांत्य फेरीत पराभूत
Published on

मेलबर्न : सर्बियाचा अग्रमानांकित तसेच गतविजेता नोव्हाक जोकोव्हिचचे साम्राज्य शुक्रवारी खालसा झाले. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इटलीच्या चौथ्या मानांकित जॅनिक सिनरने सनसनाटी विजयाची नोंद करताना जोकोव्हिचला धूळ चारली. तब्बल १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोव्हिचने कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्य लढतीत पराभव पत्करला, हे विशेष.

रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत २२ वर्षीय सिनरने ३६ वर्षीय जोकोव्हिचला ६-१, ६-२, ६-७ (६-८), ६-३ असे चार सेटमध्ये नामोहरम केले. मुख्य म्हणजे ३ तास २२ मिनिटे रंगलेल्या या लढतीत सिनरने जोकोव्हिचवर पूर्णप‌णे वर्चस्व गाजवले. जोकोव्हिचने स्वत: ग्रँडस्लॅम कारकीर्दीत आपण इतका खराब खेळ कधीच केला नव्हता, हे मान्य केले.

२०१९पासून जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सत्ता प्रस्थापित करताना सलग ३३ सामने जिंकले होते. २०२२मध्ये कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्याने जोकोव्हिच स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. २०१९, २०२०, २०२१ व २०२३ या चार वर्षी त्याने ही स्पर्धा जिंकली. यापूर्वी २०१८मध्ये उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन स्पर्धेत अखेरचा पराभूत झाला होता. जोकोव्हिचला यंदा ऑस्ट्रेलियन ओपनचे ११व्यांदा, तर कारकीर्दीतील एकंदर २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची संधी होती. मात्र सिनरने त्याची घोडदौड रोखून टेनिसविश्वात नव्या ताऱ्याचा उदय झाल्याचे घोषित केले. आता रविवारी सिनरपुढे रशियाचा डॅनिल मेदवेदेव किंवा जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

सिनरने कारकीर्दीत प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत मजल मारणारासुद्धा तो इटलीचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. सिनरने मला पूर्णपणे निष्प्रभ केले. माझ्या खेळाचा दर्जा तसेच उर्जा इतकी खालावलेली मी कधीच पाहिली नव्हती. माझ्या ग्रँडस्लॅम कारकीर्दीत मी इतका खराब कधीच खेळलो नव्हतो.

- नोव्हाक जोकोव्हिच

बोपण्णा, जोश्नाला पद्मश्री पुरस्कार

तारांकित टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पा या भारतीय क्रीडापटूंची प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बोपण्णाने नुकताच जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावले. तसेच ३७ वर्षीय जोश्नाने आशिया तसेच राष्टकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकतानाच जागतिक स्पर्धांमध्ये दुहेरीत ४ पदके मिळवली आहेत. याव्यतिरिक्त माजी हॉकीपटू हरबिंदर सिंग, महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, माजी तिरंदाज पुरीमा महातो, पॅरा-बॅडमिंटन प्रशिक्षक गौरव खन्ना आणि पॅरा-जलतरणपटू सत्येंद्र सिंग यांचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

आज बोपण्णाकडे लक्ष

भारताचा ४३ वर्षीय रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डन शनिवारी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या बोपण्णाला कारकीर्दीतील पहिले पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी असून त्यांची अंतिम फेरीत सिमोन बोलेली आणि आंद्रे वॅवासोरी या इटलीच्या बिगरमानांकित जोडीशी गाठ पडेल.

वेळ : दुपारी ३.१५ वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३

logo
marathi.freepressjournal.in