मेलबर्न : भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागलने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कारकीर्दीत प्रथमच त्याने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या अलेक्झांडर बुबलिकला तीन सेटमध्ये धूळ चारली. गेल्या ३५ वर्षांत ग्रँडस्लॅम स्पर्धेत एखाद्या मानांकित खेळाडूला नमवणारा सुमित हा पहिलाच भारतीय टेनिसपटू ठरला.
मेलबर्न येथील कोर्ट क्रमांक ८ वर झालेल्या पुरुष एकेरीतील पहिल्या सामन्यात बिगरमानांकित सुमितने कझाकस्तानच्या ३१व्या मानांकित बुबलिकवर ६-४, ६-२, ७-६ (७-५) असे प्रभुत्व मिळवले. २६ वर्षीय सुमितने २ तास आणि ३८ मिनिटांत ही लढत जिंकली. जागतिक क्रमवारीत तब्बल १३७व्या स्थानी असलेल्या सुमितसमोर आता चीनच्या शँग जंचेंगचे आव्हान असेल. शँग क्रमवारीत १४०व्या स्थानी असून गुरुवारी या दोघांत लढत होईल. शँगलाही पराभूत केल्यास सुमितपुढे तिसऱ्या फेरीत स्पेनच्या दुसऱ्या मानांकित कार्लोस अल्कराझचे आव्हान उभे ठाकू शकते.
काही महिन्यांपूर्वी पुरेसे आर्थिक पाठबळ न लाभल्याने तक्रार करणारा सुमित चर्चेत आला होता. या स्पर्धेत त्याने पात्रता फेरीचा अडथळा ओलांडून मुख्य फेरी गाठली. यंदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष अथवा महिला एकेरीत तो भारताचा एकमेव टेनिसपटू असून सुमित एकंदर चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळत आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२०च्या अमेरिकन ओपन तसेच २०२१च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो मुख्य फेरीसाठी पात्र ठरला होता. २०१९च्या अमेरिकन स्पर्धेत सुमितने मातब्बर रॉजर फेडररविरुद्ध पहिला सेटही जिंकला होता. मात्र पुढे त्याचा निभाव लागला नाही.
सध्या पात्रता फेरीतील तीन व मुख्य फेरीतील एका विजयाद्वारे सुमितने या स्पर्धेद्वारे आतापर्यंत १ लाख ८५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सची कमाई केली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सुमितचा लवकरच ‘टॉप्स’ (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) यादीत समावेश केला जाईल, अशी आशा आहे.
अल्कराझ, स्विआटेक दुसऱ्या फेरीत
स्पेनचा दुसरा मानांकित कार्लोस अल्कराझ आणि पोलंडची अग्रमानांकित तसेच गतविजेती इगा स्विआटेक यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. अल्कराझने फ्रान्सच्या रिचर्ड गॅसक्वेटवर ७-६ (७-५), ६-१, ६-२ असा विजय मिळवला. तसेच अलेक्झांडर झ्वेरेव्ह, स्टोफानोस त्सित्सिपास यांनी आपापले सलामीचे सामने जिंकले. महिलांमध्ये स्विआटेकने २०२०च्या विजेत्या सोफिया केनिनवर ७-६ (७-२), ६-२ अशी मात केली. एलिसा रायबॅकिना, जेसिका पेगुला, कोको गॉफ यांनीही आगेकूच केली.
भारताचा युकी सलामीलाच गारद
भारताचा युकी भांब्री आणि त्याचा नेदरलँड्सचा सहकारी रॉबिन हॅस यांना पुरुष दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. निकोलस बेरिंटस आणि राफेल मॅटोस यांनी युकी-रॉबिन जोडीला १-६, ७-६ (१०-८), ७-६ (१०-७) असे पिछाडीवरून नमवले. आता दुहेरीत रोहन बोपण्णा, विजय प्रशांत आणि अनिरुद्ध चंद्रशेखर हे खेळाडू टिकून आहेत. बोपण्णा त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डनविरुद्ध खेळणार असून त्यांना दुसरे मानांकन लाभले आहे.
३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८९मध्ये भारताच्या रमेश क्रिष्णनने स्वीडनच्या मॅट्स विलँडर या त्या वेळच्या जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानी असलेल्या खेळाडूला नमवले होते. त्यानंतर आता सुमितने असा पराक्रम केला.
सुमितने कारकीर्दीत दुसऱ्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. यापूर्वी २०२०च्या अमेरिकन ओपनमध्ये त्याने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनला नमवले होते. मात्र दुसऱ्या फेरीत डॉमिनिक थीमने त्याचे आव्हान संपुष्टात आणले होते.
सुमित हा गेल्या २४ वर्षांत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सामना जिकंणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी लिएण्डर पेस व सोमदेव देववर्मन यांनी अशी कामगिरी केली होती.