मेलबर्न : अमेरिकेच्या मॅडिसन किजने दोन वेळच्या माजी विजेत्या बेलारूसच्या आर्यना सबालेंकाला 6-3, 2-6, 7-5 अशी धूळ चारत शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. 29 वर्षीय खेळाडूने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम टायटलवर नाव कोरले.
गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसरी मानांकित इगा स्वियाटेकला पराभूत करत किजने अंतिम फेरीत धडक मारली होती. शनिवारी अंतिम फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित सबालेंकाला पराभवाचा चेहरा दाखवला. या कामगिरीमुळे मेलबर्न पार्कमध्ये डब्ल्यूटीएच्या अव्वल दोन खेळाडूंवर विजय मिळवणारी किज ही सेरेना विल्यम्सनंतर अशी कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
कीजने सबालेंकाला सलग तिसऱ्या महिलांच्या ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवण्यापासून रोखले. 1997-99 दरम्यान मार्टिना हिंगिसने विजेतेपदाची हॅटट्रिक केली होती. त्यानंतर अशी कामगिरी कोणत्याही महिला खेळाडूला करता आलेली नाही.
पुरुषांचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. विद्यमान चॅम्पियन जानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात ही लढत होणार आहे. सिनरने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टनला हरवले. तर नोव्हाक जोकोविचने दुखापतीमुळे सामना सोडून दिल्याने झ्वेरेव्हला अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे.
कीज ही फ्लाव्हिया पेनेटा नंतर वयाच्या 29 व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जिंकणारी सर्वात वयोवृद्ध महिला खेळाडू ठरली आहे. फ्लाव्हिया पेनेटाने 2015 मध्ये यूएस ओपनमध्ये वयाच्या 33 व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते.