
मेलबर्न : सर्बियाच्या ३७ वर्षीय नोव्हाक जोकोव्हिचने मंगळवारी त्याची टेनिसमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये का गणना केली जाते, हे पुन्हा दाखवून दिले. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात जोकोव्हिचने युवा पिढीतील तारा म्हणजेच स्पेनच्या २१ वर्षीय कार्लोस अल्कराझला पहिला सेट गमावूनही चार सेटमध्ये पराभूत केले. आता शुक्रवारी उपांत्य फेरीत जोकोव्हिचची जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी गाठ पडेल.
वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सातव्या मानांकित जोकोव्हिचने तिसऱ्या मानांकित अल्कराझवर ४-६, ६-४, ६-३, ६-४ असे चार सेटमध्ये वर्चस्व गाजवले. ३ तास आणि ३७ मिनिटांच्या थरारानंतर जोकोव्हिचने या लढतीत बाजी मारली. ऑस्ट्रेलियन वेळेनुसार रात्री १च्या सुमारास ही लढत संपली. मुख्य म्हणजे सामना जिंकल्यानंतर जोकोव्हिच आणि त्याचा नवा प्रशिक्षक अँडी मरे यांनी एकेमकांना पाहून केलेला जल्लोष लक्षवेधी ठरला. या विजयासह जोकोव्हिचने तब्बल १२व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली. तसेच कारकीर्दीत त्याने ५०व्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. जोकोव्हिचचा हा ऑस्ट्रेलियन ओपन कारकीर्दीतील ९९वा विजय ठरला, हे विशेष. त्यामुळे शतकी विजय तो शुक्रवारीच मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
गेल्या काही वर्षांत जोकोव्हिच आणि अल्कराझ यांच्यातील लढतीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. रॉजर फेडरर, राफेल नदाल यांच्या निवृत्तीनंतर आता जोकोव्हिचच्या रूपात एकमेव पस्तिशीपुढील तारांकित खेळाडू टेनिसमध्ये शिल्लक आहे. २०२३ आणि २०२४च्या विम्बल्डन अंतिम फेरीत अल्कराझने जोकोव्हिचला धूळ चारली होती. तेव्हापासून जोकोव्हिचवर सातत्याने दडपण होते. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोकोव्हिचने अल्कराझला नमवूनच सुवर्णपदक पटकावून वचपा काढला. मात्र ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये अल्कराझच वरचढ ठरत होता. अखेर मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोव्हिचने हिशेब चुकता केला. अल्कराझला मात्र अद्याप एकदाही ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरीसुद्धा गाठता आलेली नाही. सलग दोन वर्षे तो उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला.
पुरुष एकेरीच्या अन्य उपांत्यपूर्व सामन्यात दुसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने अमेरिकेच्या १२व्या मानांकित टॉमी पॉलला ७-६ (७-१), ७-६ (७-०), २-६, ६-१ असे चार सेटमध्ये पराभूत केले. झ्वेरेव्हने तिसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून त्याला कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद खुणावत आहे. बुधवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांत इटलीचा गतविजेता जॅनिक सिनेर, डी मिनॉर, बेन शेल्टन, लॉरेंझो सोनेगो कोर्टवर दिसतील.
दरम्यान, महिला एकेरीत गतविजेती आणि बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंका आणि स्पेनची ११वी मानांकित पावलो बडोसा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जोकोव्हिचची किमया
- जोकोव्हिचने १२व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली. त्याने तब्बल १० वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. फक्त २०२४मध्ये त्याला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
- २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या जोकोव्हिचला २०२४मध्ये एकही ग्रँडस्लॅम जिंकता आले नाही. त्यामुळे यावेळी त्याला ग्रँडस्लॅम जेतेपदांचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याची उत्तम संधी आहे.
- जोकोव्हिचने कारकीर्दीत ५०व्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
बोपण्णा पराभूत; भारताचे अभियान समाप्त
भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची चीनी सहकारी झेंग शुआई यांना मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला. जॉन पीर्स आणि ओलिव्हिया गॅडकी यांनी बोपण्णा-झेंग जोडीला २-६, ६-४, ११-९ असे पिछाडीवरून नमवले. बोपण्णाच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २०२४मध्ये बोपण्णाने मॅथ्यू एब्डनच्या साथीने खेळताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. मात्र यंदा निकोलस बॅरींटससह खेळताना बोपण्णा पहिल्याच फेरीत गारद झाला. आता मंगळवारी मिश्र दुहेरीतही पराभूत झाल्यामुळे तो रिकाम्या हातीच मायदेशी परतेल.