अनिश्चित काळासाठी मॅक्सवेलची विश्रांती! बंगळुरूचा पाय आणखी खोलात

बंगळुरूचा संघ सध्या सात सामन्यांतील एकमेव विजयाच्या फक्त दोन गुणांसह गुणतालिकेत १०व्या स्थानी आहे. फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूला सोमवारी हैदराबादकडून २५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
अनिश्चित काळासाठी मॅक्सवेलची विश्रांती! बंगळुरूचा पाय आणखी खोलात

बंगळुरू : ऑस्ट्रेलियाचा ३५ वर्षीय अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने खालावलेली कामगिरी तसेच मानसिक व शारीरिक थकव्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा ठरवला आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा मॅक्सवेल अनिश्चित काळासाठी विश्रांतीवर असला तरी तो भारतातच राहणार असल्याचे समजते. मात्र त्याच्या अनुपस्थितीत आधीच गुणतालिकेत तळाशी असलेल्या बंगळुरूला आणखी संघर्ष करावा लागेल, असे दिसते.

बंगळुरूचा संघ सध्या सात सामन्यांतील एकमेव विजयाच्या फक्त दोन गुणांसह गुणतालिकेत १०व्या स्थानी आहे. फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूला सोमवारी हैदराबादकडून २५ धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबादने तब्बल २८७ ही विक्रमी धावसंख्या नोंदवताना बंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई केली. या लढतीसाठी बंगळुरूने मॅक्सवेलला संघातून वगळले. मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर स्वत: मॅक्सवेलनेच संघ व्यवस्थापन व डू प्लेसिसला आपल्याला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले. मुंबईविरुद्धच मॅक्सवेलच्या उजव्या हाताच्या बोटालासुद्धा काहीशी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला हैदराबादविरुद्ध संघात स्थान देण्यात आले नाही. मॅक्सवेलने यंदाच्या आयपीएलमध्ये सहा सामन्यांत अनुक्रमे ०, ३, २८, ०, १, ० अशा फक्त ३२ धावा केल्या आहेत.

“मुंबईविरुद्धच्या लढतीनंतर मी स्वत:हून डू प्लेसिस व प्रशिक्षकांशी संवाद साधला. माझ्या जागेवर त्यांनी अन्य एकाला संधी द्यावी, अशी मी विनंती केली. गेल्या काही सामन्यांत मी माझे सर्वोत्तम योगदान देऊ शकलेलो नाही. त्यामुळे मला मानसिक तसेच शारीरिक विश्रांतीची गरज जाणवत आहे. मला मानसिकदृष्ट्या स्थिर वाटल्यास मी नक्कीच पुन्हा स्पर्धेत परतेन,” असे मॅक्सवेल म्हणाला. मॅक्सवेलने कारकीर्दीत दुसऱ्यांदा अशाप्रकारे विश्रांती घेतली आहे. यापूर्वी त्याने ऑक्टोबर २०१९मध्ये सततच्या क्रिकेटमुळे दोन महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता.

“पॉवरप्लेनंतरही संघाची धावगती वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. गेल्या दोन हंगामांमध्ये मी ही भूमिका उत्तमपणे बजावत होतो. मात्र यंदा मी स्वत:च्या कामगिरीद्वारे समाधानी नाही. त्यामुळे आताच अन्य खेळाडूला त्याचे कौशल्य दाखवण्याची संधी देणे गरजेचे आहे,” असेही मॅक्सवेलने सांगितले. २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार असल्याने मॅक्सवेल आता थेट या स्पर्धतेच खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चेन्नईचा मुस्तफिझूर १ मेपर्यंतच खेळणार

चेन्नईकडून खेळणारा बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान १ मेपर्यंतच यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. २८ वर्षीय मुस्तफिझूरने या आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ सामन्यांत १० बळी मिळवले आहेत. मात्र बांगलादेश क्रिकेट संघ ३ ते १२ मेदरम्यान झिम्बाब्वेशी आणि २१ मेपासून अमेरिकाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. जूनमध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने बांगलादेशसाठी या दोन्ही मालिका महत्त्वाच्या असून मुस्तफिझूर संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) त्याला १ मेपर्यंतच खेळण्याची मुभा दिली आहे. मुस्तफिझूर आता लखनऊविरुद्धच्या दोन (१९, २३ एप्रिल), हैदराबाद (२८ एप्रिल) व १ मे (पंजाब) या लढतींसाठी उपलब्ध असेल.

logo
marathi.freepressjournal.in