
नवी दिल्ली : बॅटमिंटनच्या पटलावर सोमवारी नव्या भारतीय ताऱ्याचा उदय झाला. भारताच्या २० वर्षीय आयुष शेट्टीने यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला. मुख्य म्हणजे आयुषच्या रुपात २०२५ या वर्षात प्रथमच एखाद्या भारतीयाने बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.
३०० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत आयुषने कॅनडाच्या तिसऱ्या मानांकित ब्रायन यंगला २१-१८, २१-१३ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. कारकीर्दीतील पहिलेच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर जेतेपद मिळवणाऱ्या आयुषने १ तासात ही लढत जिंकली.
उपांत्य फेरीत आयुषने पिछाडीवरून सरशी साधत चीनच्या अग्रमानांकित चो टिन चेनला नमवले होते. अंतिम फेरीत मात्र आयुषने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. त्याने कारकीर्दीत एकंदर तिसऱ्यांदा ब्रायनवर वर्चस्व गाजवले. यापूर्वी दोन वेळा आयुषने त्याला नमवले होते. आयुषची उंची ६ फुट ४ इंच इतकी असून त्याच्याकडे भविष्यातील तारा म्हणून पाहिले जात आहे.
“वरिष्ठ कारकीर्दीतील हे माझे पहिलेच जेतेपद आहे. त्यामुळे हा विजय खास आहे. संपूर्ण आठवड्यात मी चमकदार खेळ केला. कुटुंबीय आणि प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. आता खऱ्या अर्थाने कारकीर्दीला सुरुवात झाली असून पुढील आठवड्यात रंगणाऱ्या कॅनडा ओपन स्पर्धेतही मी सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे आयुष जेतेपदानंतर म्हणाला.
“पहिल्या गेममध्ये मी काहीशी घाई केली. मात्र त्यानंतर मी पुनरागमन केले. माझ्या स्मॅशेसवर मला विश्वास आहे. प्रशिक्षकांनी माझ्या उंचीचाची पुरेसा वापर करून घेतला,” असेही आयुषने सांगितले. आयुषने २०२३मध्ये ओदिशा मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तसेच २०२४मध्ये डच ओपन स्पर्धेत तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र यावेळी त्याने वरिष्ठ कारकीर्दीतील पहिले जेतेपद पटकावून दाखवले.
२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. लक्ष्य सेन, सिंधू, सात्विक-चिराग यांसारख्या तारांकित खेळाडूंचा समावेश असूनही भारताचा एकही खेळाडू सुवर्णपदकाच्या लढतीपर्यंत पोहोचला नाही, तर लक्ष्य कांस्यपदकाच्या सामन्यात पराभूत झाला होता.
त्यानंतर २०२५ सुरू झाल्यापासून भारताच्या एकाही बॅडमिंटनपटूने आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिकंलेली नाही. सात्विक-चिराग या पुरुष दुहेरीतील जोडीने काही स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. तसेच किदाम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, प्रणॉय यांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विशेषत: सिंधूची कामगिरी सातत्याने ढासळत आहे. २०२४ पासून ती एकही स्पर्धा जिंकलेली नाही. मात्र २० वर्षीय आयुषच्या जेतेपदामुळे भारतीय बॅडमिंटनला नवी उमेद मिळाली आहे. त्याच्यावर आता यापुढेही लक्ष असेल.
महिलांमध्ये तन्वी उपविजेती
महिला एकेरीत भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्याच अग्रमानांकित बैवान झँगने तन्वीला २१-११, १६-२१, २१-१० असे तीन गेममध्ये पराभूत केले. तन्वीने जेतेपद मिळवले असते, तर भारतासाठी सोमवारचा दिवस दुहेरी जेतेपदाचा ठरला असता. “माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. मात्र जेतेपदाने हुलकावणी दिल्याची खंत आहे. कारकीर्दीतील ३०० सुपर गुणांच्या स्पर्धेत मी प्रथमच अंतिम फेरी गाठली होती,” असे तन्वी म्हणाली.