बाबर, रिझवान यांना वगळले! आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; सलमानकडे नेतृत्व

आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसह संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी फलंदाजांच्या जोडीला पाकिस्तानच्या टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. ३१ वर्षीय सलमान अली या स्पर्धेत पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे.
बाबर, रिझवान यांना वगळले! आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; सलमानकडे नेतृत्व
Photo : X
Published on

लाहोर : आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसह संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी फलंदाजांच्या जोडीला पाकिस्तानच्या टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. ३१ वर्षीय सलमान अली या स्पर्धेत पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे.

यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे यूएई येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तान व यूएई यांच्यासह २९ ऑगस्टपासून तिरंगी मालिका खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने भविष्याचा विचार करता युवा खेळाडूंवर विश्वास दर्शवला असून बाबर, रिझवानला डच्चू दिला आहे. अपेक्षेनुसार फटकेबाजी करण्यात येणारे अपयश व धावांची संथ गती या दोन प्रमुख कारणास्तव बाबर व रिझवानला वगळण्यात आले आहे, असे समजते. आता याचा बाबर, रिझवानवर सकारात्मक परिणाम होणार की ते टी-२० तून निवृत्ती जाहीर करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

३० वर्षीय बाबर डिसेंबर २०२४मध्ये पाकिस्तानसाठी अखेरचा टी-२० सामना खेळला. त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये १० सामन्यांत १२८च्या स्ट्राइक रेटने २८८ धावा केल्या. तसेच नुकताच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही बाबर फारशी छाप पाडू शकला नाही. तसेच ३३ वर्षीय रिझवान पण डिसेंबरपासून टी-२० संघाच्या बाहेर आहे. २०२१मध्ये यूएई येथील टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताला नमवले होते. त्यावेळी बाबर व रिझवानच त्यांच्या विजयाचे शिल्पकार होते.

“बाबरला संघ व्यवस्थापनाने काही बाबींवर कार्य करण्याचे सुचवले आहे. आशिया चषकात फिरकीला पोषक खेळपट्ट्या असतील. अशा वेळी फिरकी योग्य खेळण्यासह धावगतीही वाढवणे गरजेचे आहे. सध्या टी-२० संघात बाबर, रिझवानच्या तुलनेत अधिक स्ट्राइक रेटने फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळेच गेल्या काही काळासासून या दोघांचा टी-२० प्रकारासाठी विचार करण्यात आलेला नाही,” असे पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी सांगितले. साहिबझादा फरहानने कारकीर्दीतील गेल्या ६ पैकी ३ सामन्यांत सामनावीर पुरस्कार मिळवला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नसीम शाहलासुद्धा संघात स्थान लाभलेले नाही, तर दुखापतीतून सावरलेल्या फखर झमानचे पुनरागमन झाले आहे.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत.

बाबर व रिझवान दोघेही आठ महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०२४मध्ये अखेरचा टी-२० सामना खेळले आहेत. त्यामुळे लवकरच ते या प्रकारातून निवृत्ती पत्करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तानचा संघ

सलमान अली (कर्णधार), अब्रार अहमद, फहीम अश्रफ, फखर झमान, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसैन तलत, खुशदील शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासिम, साहिबझादा फरहान, सय्यम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम.

logo
marathi.freepressjournal.in