भारताचे दोन्ही संघ थाटात बाद फेरीत, सिंधूचे शानदार पुनरागमन; महिलांची अग्रमानांकित चीनवर मात

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बुधवारी पाच महिन्यांच्या कालावधीनंतर दमदार पुनरागमन केले.
भारताचे दोन्ही संघ थाटात बाद फेरीत, सिंधूचे शानदार पुनरागमन; महिलांची अग्रमानांकित चीनवर मात

शाह आलम (मलेशिया) : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बुधवारी पाच महिन्यांच्या कालावधीनंतर दमदार पुनरागमन केले. याबरोबरच भारताच्या पुरुष व महिला संघांनी आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला.

मलेशिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय महिला संघाने डब्ल्यू-गटातील एकमेव सामन्यात अग्रमानांकित चीनवर ३-२ अशी मात केली. या गटात दोनच संघ असल्याने भारत, चीन या दोघांनीही आगेकूच केली. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या सिंधूने एकेरीच्या पहिल्या लढतीत ४० मिनिटांतच विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या सिंधूने आठव्या क्रमांकावरील हॅन ह्यूला २१-१७, २१-१५ अशी धूळ चारली. त्यानंतर तनिषा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांना महिला दुहेरीच्या लढतीत ल्यू शेंग आणि टॅन निंग यांच्याकडून १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच एकेरीच्या दुसऱ्या लढतीत अश्मिता छलिहासुद्धा वँग झीकडून १३-२१, १५-२१ अशी पराभूत झाल्याने भारत पिछाडीवर पडला.

मात्र दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत ट्रीसा जॉली व गायत्री गोपिचंद यांनी ली यिंग व लू मिन यांना १०-२१, २१-१८, २१-१७ असे तीन गेममध्ये नमवले. मग निर्णायक पाचव्या व एकेरीच्या तिसऱ्या लढतीत अनमोल खर्बने वू लू यू हिच्यावर २२-२०, १४-२१, २१-१८ अशी तीन गेममध्ये सरशी साधून भारताला ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून दिला.

logo
marathi.freepressjournal.in