श्रीकांत उपांत्य फेरीत; स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा

श्रीकांत उपांत्य फेरीत; स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा

या मोसमातील आपल्या आठव्या स्पर्धेत खेळताना श्रीकांतने शांत आणि संयमी खेळ करत जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी असलेल्या चिआ ली याचे आव्हान अवघ्या ३५ मिनिटांत २१-१०, २१-१४ असे सहज परतवून लावले.

बसेल : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने चायनीज तैपेईच्या चिया हाओ ली याच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत स्विस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तब्बल १६ महिन्यांनंतर त्याने एखाद्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

या मोसमातील आपल्या आठव्या स्पर्धेत खेळताना श्रीकांतने शांत आणि संयमी खेळ करत जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी असलेल्या चिआ ली याचे आव्हान अवघ्या ३५ मिनिटांत २१-१०, २१-१४ असे सहज परतवून लावले.

अनेक सामन्यांत विजयाची संधी असतानाही पराभूत व्हावे लागलेल्या श्रीकांतने अखेरीस दमदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. यापूर्वी नोव्हेंबर २०२२मध्ये त्याने हायओ ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या श्रीकांतला आता उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या लिन चून-यी याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

गुंतूरच्या ३१ वर्षीय किरण जॉर्ज याला उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याकडून २३-२१, १७-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर प्रियांशू राजावत यालाही उपांत्यपूर्व फेरीत चोऊ टिएन चेन याने १५-२१, १९-२१ असे पराभूत केले.

श्रीकांतने आधीच्या चुकांमधून बोध घेत, दमदार खेळ करत सुरुवातीलाच ८-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याने ती पुढे ११-५ अशी वाढवली. पहिला गेम ११ गुणांच्या फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये मात्र ७-५, ८-७ अशी चुरस दोघांमध्ये सुरू होती. श्रीकांतने ११-८ अशी आघाडी घेतली, मात्र चिआ ली याने १२-१४ अशी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर श्रीकांतने लागोपाठ गुण मिळवत विजय प्राप्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in