जागतिक कुस्ती संघटनेकडूनही बजरंग वर्षाअखेरपर्यंत निलंबित

उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेने (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल टाकत संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाला वर्षअखेरपर्यंत निलंबित केले आहे.
जागतिक कुस्ती संघटनेकडूनही बजरंग वर्षाअखेरपर्यंत निलंबित

नवी दिल्ली : उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेने (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल टाकत संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाला वर्षअखेरपर्यंत निलंबित केले आहे. जागतिक संघटनेच्या या निर्णयामुळे केवळ ऑलिम्पिकच नाही, तर ३० वर्षीय बजरंगच्या कारकीर्दीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भारतातील सर्वात यशस्वी कुस्तीगीर असलेल्या बजरंगने २३ एप्रिल रोजी केलेल्या चाचणीस नकार दिल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. आपण चाचणीस कधीच नकार दिला नव्हता. चाचणीसाठी मुदत संपलेले साहित्य वापरण्यात येत असल्याबद्दल आपण त्याबाबत विचारणा केली होती अशी प्रतिक्रिया बजरंगने त्यावेळी दिली होती.

जागतिक महासंघाने आपल्या संकेतस्थळावर बजरंगच्या नावापुढे निलंबित असे नमूद केले असले, तरी जागतिक संघटनेकडून आपल्याशी कुठल्याही प्रकाराच संवाद साधण्यात आलेला नाही, असे बजरंग म्हणाला. उत्तेजकविरोधी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली असून, यामुळे आम्ही त्याला ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत निलंबित करत आहोत, असे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने स्पष्ट केले आहे.

कारवाईनंतरही निधी मंजूर

परदेशी प्रशिक्षणासाठी आपण ‘साइ’ कडे निधीबाबत विचारणा केल्याचे बजरंगने मान्य केले. मात्र, कारवाईनंतरही ९ लाख निधी मंजूर झाल्याचे पाहून आपणच चकित झालो आहोत, असे सांगत बजरंगने प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे नियोजन रद्द केले असल्याचे सांगितले. ‘नाडा’च्या कारवाईबाबत वकिलाने उत्तर दिले असल्याची माहितीही बजरंगने दिली. ‘साइ’ने २५ एप्रिल रोजीच बजरंगच्या विदेशातील प्रशिक्षणासाठी ९ लाखांचा निधी मंजूर केला होता. बजरंग २८ मेपासून रशियात प्रशिक्षणासाठी जाणे अपेक्षित होते. आता मात्र तो ऑलिम्पिक स्पर्धेतही खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in