राजकारणात प्रवेश करण्यासाठी बजरंग, विनेश, साक्षीचा खटाटोप! संजय सिंह यांचे आरोप; क्रीडा मंत्रालयाविरुद्ध न्यायालयात धाव घेणार

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या बृजभूषण शरण सिंह यांचे संजय हे निकटवर्तीय मानले जातात.
राजकारणात प्रवेश करण्यासाठी बजरंग, विनेश, साक्षीचा खटाटोप! संजय सिंह यांचे आरोप; क्रीडा मंत्रालयाविरुद्ध न्यायालयात धाव घेणार

नवी दिल्ली : बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली असून त्यांना राजकारणात प्रवेश करायचा आहे. युवा खेळाडूंची ते जागा अडवून बसले आहेत, असा स्पष्ट आरोप भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) नवे अध्यक्ष संजय सिंह यांनी केला आहे. तसेच क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ बरखास्त करताना योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही. त्यामुळे याविरुद्ध आपण न्यायालयात अपील करणार असल्याचेही ते म्हणाले.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या बृजभूषण शरण सिंह यांचे संजय हे निकटवर्तीय मानले जातात. संजय यांची गेल्या आठवड्यात कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. याचा विरोध म्हणून ३१ वर्षीय साक्षीने निवृत्ती जाहीर केली. तर २९ वर्षीय बजरंगने पद्मश्री पुरस्कार शासनाला परत केला. मंगळवारी विनेशनेसुद्धा खेलरत्न व अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. क्रीडा मंत्रालयाने रविवारी कुस्ती महासंघाला निलंबित केले असले तरी हे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही.

“आम्ही निवडणूक प्रक्रियेद्वारे जिंकून आलो आहोत. कोणताही गैर मार्ग अवलंबलेला नाही. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने कारवाई करताना सर्व पडताळणी करणे गरजेचे होते. आम्ही याविरोधात न्यायालात दाद मागू,” असे संजय म्हणाले. “तिघेही कुस्तीपटू राजकारणात प्रवेश घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. तसेच त्यांना आपली जागा सांभाळून ठेवायची असून युवा पिढीला वर येऊ द्यायचे नाही. या तिघांव्यतिरिक्त कोणताही युवा कुस्तीपटू महासंघाला विरोध दर्शवताना दिसत नाही. बजरंगची आशियाई स्पर्धेत काय अवस्था झाली, हे आपण पाहिलेच,” असेही संजय यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in