बंगळुरू : सुरुवातीच्या टप्प्यात सलग सहा पराभव पत्करल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे यंदाच्या आयपीएलमधीलही आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. पण बंगळुरूने सलग चार सामने जिंकून प्ले-ऑफमधील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. त्यातच आता कर्णधार ऋषक्ष पंतविना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलग पाचवा विजय मिळवण्याचे ध्येय बंगळुरूने ठेवले आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल ऋषक्ष पंत याच्यावर एका सामन्याची बंदी आणि ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्लीचा हा या मोसमातील तिसरा गुन्हा ठरल्याने त्यांच्या कर्णधारावर बंदीची कारवाई करण्यात आली. पंतच्या गैरहजेरीचा फायदा बंगळुरूला होणार आहे. साखळी फेरीतील दुसऱ्या टप्प्यात बंगळुरूने गुजरात टायटन्सला दोनदा, तर पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादवर एक वेळा विजय मिळवत आपली गाडी रूळावर आणली. बंगळुरूकडे सध्या १२ सामन्यांत १० गुण जमा असून त्यांनाही प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र या सामन्यातील पराभवानंतर त्यांचे बाद फेरीतील स्थान संपुष्टात येऊ शकते.
विराट कोहलीची सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी हे बंगळुरूच्या यशाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६३४ धावा फटकावल्या असून बंगळुरूची पूर्ण भिस्त त्याच्या कामगिरीवरच आहे. कोहलीपाठोपाठ कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस, रजत पाटिदार, कॅमेरून ग्रीन आणि दिनेश कार्तिक हे अधूनमधून संघाच्या मदतीला धावून येत आहेत. तसेच गोलंदाजांचीही कामगिरी बंगळुरूच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरत आहे. मोहम्मद सिराज १० दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार कामगिरी करत असून त्याला यश दयाल तसेच डावखुरा फिरकीपटू स्वप्नील सिंग यांचीही चांगली साथ लाभत आहे. मात्र दिल्लीचा तडाखेबंद सलामीवीप जेक फ्रेझर-मॅकगर्क याच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. मॅकगर्कने सात सामन्यांत ३०९ धावा कुटत आपण जबरदस्त फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. ७ सामन्यांत फक्त १६७ धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची जागा त्याने घेतली आणि दिल्लीच्या यशात मौल्यवान योगदान दिले.
जेक फ्रेझर आणि त्याचा सलामीचा साथीदार अभिषेक पोरेल यांची जोडी चांगली जमली आहे. त्याचबरोबर ऋषक्ष पंत आणि त्रिस्तान स्टब्स फलंदाजीत उपयुक्त खेळी करत असल्यामुळे त्यांच्याकडून दिल्लीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
बंगळुरूच्या तुलनेत दिल्लीचे गोलंदाज यंदाच्या आयपीएलमध्ये कमालीचे फॉर्मात आहेत. फिरकीपटू कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी मिळून २४ बळी घेतले आहेत. तसेच प्रतिस्पर्धी फलंदाजांना वेसण घालण्यातही ते यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या आठ षटकांच्या दमदार गोलंदाजीमुळे दिल्लीला सामन्यावर पकड मिळवता येते अथवा पुनरागमन करण्यात मदत मिळते. खलील अहमद (१४ बळी) आणि मुकेश कुमार (१५ विकेट्स) हे फॉर्मात परतले तर दिल्लीला विजय मिळवणे मुश्कील जाणार नाही. दिल्लीचा संघ सध्या १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, करन शर्मा, मनोज भडांगे, मयांक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा, रंजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भूई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स, लिझाड विल्यम्स.