जयपूरमध्येही बंगळुरूची बाजी! सॉल्ट, विराटची दमदार अर्धशतके; राजस्थानवर ९ गडी राखून वर्चस्व

बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली. फिल सॉल्ट (३३ चेंडूंत ६५ धावा) आणि विराट कोहली (४५ चेंडूंत नाबाद ६२ धावा) यांनी झळकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या बळावर बंगळुरूने रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ९ गडी आणि १५ चेंडू राखून धुव्वा उडवला.
जयपूरमध्येही बंगळुरूची बाजी! सॉल्ट, विराटची दमदार अर्धशतके; राजस्थानवर ९ गडी राखून वर्चस्व
जयपूरमध्येही बंगळुरूची बाजी! सॉल्ट, विराटची दमदार अर्धशतके; राजस्थानवर ९ गडी राखून वर्चस्वX - @RCBTweets
Published on

बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली. फिल सॉल्ट (३३ चेंडूंत ६५ धावा) आणि विराट कोहली (४५ चेंडूंत नाबाद ६२ धावा) यांनी झळकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या बळावर बंगळुरूने रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ९ गडी आणि १५ चेंडू राखून धुव्वा उडवला.

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या या लढतीत राजस्थानला १७३ धावांत रोखल्यावर बंगळुरूने हे लक्ष्य १७.३ षटकांत गाठले. सहा सामन्यांतील चौथ्या विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत तिसरे स्थान प्राप्त केले, तर राजस्थानला सहा लढतींमध्ये चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ५ चौकार व ६ षटकारांसह ३३ चेंडूंत ६५ धावा फटकावणाऱ्या सॉल्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्य म्हणजे बंगळुरूने चारही विजय हे प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात मिळवलेले आहेत. तर त्यांचे दोन पराभव हे घरच्या मैदानात म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवरील आहेत.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ४ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारली. आव्हानात्मक खेळपट्टीवर राजस्थानने काहीशी संथ सुरुवात केली. कर्णधार संजू सॅमसन १९ चेंडूंत फक्त १५ धावांवर बाद झाला. मात्र त्याने व यशस्वी जैस्वालने ४९ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर यशस्वी व रियान पराग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भर घातली. यशस्वीने १० चौकार व २ षटकारांसह यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक साकारले.

मात्र १६व्या षटकात जोश हेझलवूडने यशस्वीला ७५ धावांवर पायचीत पकडले आणि तेथून राजस्थानची धावगती आणखी मंदावली. पराग (३०), शिम्रॉन हेटमायर (९) छाप पाडू शकले नाहीत. ध्रुव जुरेलने २३ चेंडूंत ३५ धावा फटकावल्याने राजस्थानने १७० धावांचा पल्ला गाठला. नितीश राणाने डावातील अखेरच्या चेंडूवर चौकार लगावला. बंगळुरूने काहीसे गचाळ क्षेत्ररक्षण करत १० ते १२ धावा अतिरिक्त दिल्या. त्यांच्यासाठी हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या व यश दयाल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

लक्ष्याच पाठलाग करताना मात्र बंगळुरूने पहिल्या षटकापासूनच आक्रमण केले. सॉल्टने हंगामातील दुसरे अर्धशतक फटकावताना विराटसह ५२ चेंडूंतच ९२ धावांची सलामी नोंदवली. राजस्थानने दोघांनाही प्रत्येकी एकदा जीवदान दिले. त्याचा दोन्ही खेळाडूंनी लाभ घेतला. अखेर कुमार कार्तिकेयने सॉल्टला बाद केले. मात्र त्यानंतर विराट व देवदत्त पडिक्कल या जोडीने सूत्रे हाती घेतली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची अभेद्य भागीदारी रचून १७.३ षटकांत संघाचा विजय साकारला. विराटने विशेषत: हंगामातील तिसरे आणि टी-२० कारकीर्दीतील एकंदर १००वे अर्धशतक पूर्ण करताना ४ चौकार व २ षटकार लगावले. तर पडिक्कलने २८ चेंडूंत नाबाद ४० धावा करताना ५ चौकार व १ षटकार ठोकला. पडिक्कलनेच संदीप शर्माच्या गोलंदाजीवर विजयी चौकार लगावत बंगळुरूच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. आता बंगळुरूची शुक्रवारी पंजाबशी गाठ पडेल, तर राजस्थान बुधवारी दिल्लीविरुद्ध खेळणार आहे.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ४ बाद १७३ (यशस्वी जैस्वाल ७५, ध्रुव जुरेल नाबाद ३५; जोश हेझलवूड १/२६) पराभूत वि. g रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १७.३ षटकांत १ बाद १७५ (फिल सॉल्ट ६५, विराट कोहली नाबाद ६२, देवदत्त पडिक्कल नाबाद ४०; कुमार कार्तिकेय १/२५)

सामनावीर : फिल सॉल्ट

विराटचे टी-२० कारकीर्दीतील तब्बल १००वे अर्धशतक

विराटने रविवारी टी-२० कारकीर्दीतील (आंतरराष्ट्रीय व आयपीएल मिळून) एकंदर १००वी अर्धशतकी खेळी साकारली. अशी कामगिरी करणारा तो विश्वातील दुसरा, तर भारताचा पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी फक्त डेव्हिड वॉर्नरने (१०८ अर्धशतके) अशी कामगिरी केली आहे. विराटची आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ३८ अर्धशतके आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने ५८ अर्धशतके झळकावली आहेत. ४ अर्धशतके ही देशांतर्गत स्थानिक टी-२० स्पर्धांमधील आहेत. विराट व वॉर्नर दोघेही आता आंतरराष्ट्रीय टी-२०मधून निवृत्त झाले असले, तरी विराट आयपीएलमध्ये, तर वॉर्नर विविध देशांच्या टी-२० लीगमध्ये खेळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in