बंगळुरूच्या पोरी दिल्लीवर भारी! महिलांच्या प्रीमियर लीगचे प्रथमच विजेतेपद

ऑफस्पिनर श्रेयांका पाटीलनेसुद्धा चार बळी मिळवून दिल्लीच्या तळाच्या फलंदाजांना गुंडाळले. दिल्लीने पॉवरप्लेनंतरच्या ४२ चेंडूंमध्ये एकही चौकार लगावला नाही.
बंगळुरूच्या पोरी दिल्लीवर भारी! महिलांच्या प्रीमियर लीगचे प्रथमच विजेतेपद

नवी दिल्ली : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर ८ गडी आणि ३ चेंडू राखून वर्चस्व गाजवले. याबरोबरच सांगलीच्या स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) दुसऱ्या हंगामाचे जेतेपद मिळवले. बंगळुरूच्या संघाने गेल्या १६ वर्षांमध्ये आयपीएल अथवा डब्ल्यूपीएलच्या इतिहासात प्रथमच जेतेपदाला गवसणी घातली, हे विशेष.

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या लढतीत दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र दिल्लीच्या आक्रमक सुरुवातीनंतर बंगळुरूच्या फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे दिल्लीचा डाव १८.३ षटकांत ११३ धावांतच संपुष्टात आला. शफाली वर्मा आणि लॅनिंग यांनी ४३ चेंडूंतच ६४ धावांची सलामी नोंदवली. विशेषत: शफालीने २ चौकार व ३ षटकारांसह २७ चेंडूंतच ४४ धावा फटकावून बंगळुरूची धुलाई केली.

मात्र आठव्या षटकात डावखुरी फिरकीपटू सोफी मोलिनिक्स गोलंदाजीसाठी आली व सामन्याला कलाटणी मिळाली. तिने प्रथम शफालीचा अडथळा दूर केला. मग त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्जचा (२) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर एलिस कॅप्सीलासुद्धा (०) त्रिफळाचीत करून तिने बंगळुरूची बिनबाद ६४ वरून ३ बाद ६४ अशी अवस्था केली. यातून मग दिल्लीचा संघ सावरूच शकला नाही. ऑफस्पिनर श्रेयांका पाटीलनेसुद्धा चार बळी मिळवून दिल्लीच्या तळाच्या फलंदाजांना गुंडाळले. दिल्लीने पॉवरप्लेनंतरच्या ४२ चेंडूंमध्ये एकही चौकार लगावला नाही.

लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती आणि सोफी डिवाईन यांनी ८ षटकांत ४९ धावांची सलामी नोंदवली. मात्र स्मृती ३१, तर डिवाईन ३२ धावांवर बाद झाल्यावर सामन्यात काहीशी रंगत निर्माण झाली. परंतु, अनुभवी एलिस पेरी आणि युवा रिचा घोष यांच्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी रचून १९.३ षटकांत बंगळुरूचा विजय साकारला. पेरीने नाबाद ३५, तर रिचाने नाबाद १७ धावा केल्या. अखेरच्या षटकात ५ धावांची आवश्यकता रिचानेच विजयी चौकार लगावला आणि याबरोबरच बंगळुरूने प्रथमच डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवले.

२००८मध्ये पुरुषांच्या आयपीएलला प्रारंभ झाल्यापासून बंगळुरूने एकदाही ती स्पर्धा जिंकलेली नाही. महिलांच्या संघाने मात्र डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या पर्वातच बाजी मारली. त्यामुळे यातून प्रेरणा घेत पुरुषांचा संघही यंदा जेतेपद मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक

  • दिल्ली कॅपिटल्स : १८.३ षटकांत सर्व बाद ११३ (शफाली वर्मा ४४, मेग लॅनिंग २३; सोफी मोलिनिक्स ३/२०, श्रेयांका पाटील ४/१२) पराभूत वि.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १९.३ षटकांत २ बाद ११५ (एलिस पेरी नाबाद ३५, सोफी डिवाईन ३२, स्मृती मानधना ३१; शिखा पांडे १/११)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in