बांगलादेशमध्ये IPL बॅन! प्रसारणावर अनिश्चितकालीन बंदी; मुस्तफिजुर रहमानला KKR मधून बाहेर काढल्यामुळे निर्णय

टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात संघ पाठवणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर आता बांगलादेशने आयपीएलच्या प्रसारणावरही बंदी घातली आहे.
बांगलादेशमध्ये IPL बॅन! प्रसारणावर अनिश्चितकालीन बंदी; मुस्तफिजुर रहमानला KKR मधून बाहेर काढल्यामुळे निर्णय
Published on

बांगलादेशमध्ये आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांचे प्रसारण होणार नाही, अशी माहिती बांगलादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने सोमवारी दिली. आयपीएलच्या २०२६ हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स संघातून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“भारतीय क्रिकेट बोर्डाने कोलकाता नाइट रायडर्सला IPL २०२६ साठी मुस्ताफिझूर रहमानला संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे बांगलादेशातील नागरिक दुखावले असून त्यांच्यात संतापाची भावना आहे. त्यामुळे मिळालेल्या सूचनांनुसार IPL चे सर्व सामने आणि कार्यक्रमांचे प्रसारण थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे.” असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

अपमान आम्ही सहन करणार नाही

हा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील युवक व क्रीडा सल्लागार आसिफ नझरूल यांनी सोशल मीडियावर केलेल्या विधानानंतर घेतला गेला आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमधील नझरूल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये माहिती व प्रसारण सल्लागारांना बांगलादेशमध्ये IPL चे प्रसारण थांबवण्याची विनंती केल्याचे सांगितले होते. “बांगलादेशच्या क्रिकेटचा, क्रिकेटपटूंचा आणि देशाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले होते.

भारत आणि बांगलादेशमधील सुरू असलेल्या राजकीय तणावाचा फटका क्रिकेट संबंधांनाही बसताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनेही शनिवारी यावर्षी होणारा भारताचा बांगलादेश दौरा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला, त्याचबरोबर केकेआरकडून मुस्ताफिझूरला मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, एक दिवसापूर्वीच, रविवार, ४ जानेवारी रोजी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. आपले सामने पाकिस्तानप्रमाणे श्रीलंकेत आयोजित करण्याची विनंती आयसीसीला केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in