बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय! पाकिस्तानविरुद्ध प्रथमच जिंकली कसोटी मालिका

अखेर बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत धूळ चारून ऐतिहासिक कसोटी मालिका विजय साकारला.
बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय! पाकिस्तानविरुद्ध प्रथमच जिंकली कसोटी मालिका
@ICC/X
Published on

रावळपिंडी : अखेर बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत धूळ चारून ऐतिहासिक कसोटी मालिका विजय साकारला. बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर ६ गडी राखून मात करत मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादने केले. तसेच प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली.

रावळपिंडी येथे झालेल्या या कसोटीत पाकिस्तानने दिलेले १८५ धावांचे लक्ष्य बांगलादेशने पाचव्या दिवशी ५६ षटकांत गाठले. शाकिब अल हसनने (नाबाद २१) चौकार लगावून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. झाकीर हसन (४०), नजमूल शांतो (३८), मुशफिकूर रहीम (नाबाद २२) यांनीही उत्तम योगदान दिले. पहिल्या डावात ६ बाद २६ अशा स्थितीतून शतक साकारणारा लिटन दास सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर दोन सामन्यांत १५५ धावा करण्यासह १० बळी मिळवणारा अष्टपैलू मेहदी हसन मिराजला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

बांगलादेशने या मालिकेपूर्वी पाकिस्तानविरुद्ध सलग १३ कसोटी सामने जिंकले होते. मात्र पहिल्या कसोटीत त्यांनी पाकिस्तानला १० गडी राखून धूळ चारली. मुख्य म्हणजे त्या कसोटीत पाकिस्तानने पहिला डाव घोषित केला होता. मात्र त्यानंतर बांगलादेशने बाजी मारली. तर आताही त्यांनी पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. १५ वर्षांनी प्रथमच बांगलादेशने विदेशात एखादी मालिका जिंकली. २००९मध्ये त्यांनी विंडीजला त्यांच्याच भूमीत नमवले होते.

logo
marathi.freepressjournal.in