बांगलादेशचा भारतात खेळण्यास नकार कायम; ICC च्या उत्तराची प्रतीक्षा; स्पर्धेतून गच्छंती होण्याची शक्यता

भारतात टी-२० विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी न येण्याच्या निर्णयावर बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) ठाम आहे. त्यामुळे आता यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून आहे. बांगलादेशची स्पर्धेतून गच्छंती केली जाण्याची शक्यता असून स्कॉटलंडला स्पर्धेत प्रवेश दिला जाऊ शकतो.
बांगलादेशचा भारतात खेळण्यास नकार कायम; ICC च्या उत्तराची प्रतीक्षा; स्पर्धेतून गच्छंती होण्याची शक्यता
बांगलादेशचा भारतात खेळण्यास नकार कायम; ICC च्या उत्तराची प्रतीक्षा; स्पर्धेतून गच्छंती होण्याची शक्यता
Published on

ढाका : भारतात टी-२० विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी न येण्याच्या निर्णयावर बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) ठाम आहे. त्यामुळे आता यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून आहे. बांगलादेशची स्पर्धेतून गच्छंती केली जाण्याची शक्यता असून स्कॉटलंडला स्पर्धेत प्रवेश दिला जाऊ शकतो.

भारत व श्रीलंका येथे ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र हिंदू नागरिकांवर बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अत्याचारांमुळे बांगलादेशचा क्रिकेटपटू मुस्तफिझूर रहमानला बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळण्यास विरोध केला. त्या प्रत्युत्तरात बांगलादेशने विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला. तसेच बांगलादेशचा स्पर्धेतील गट बदलण्यात यावा, अशीही मागणी केली. आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळून लावली असून त्यांना भारतात कोणताही धोका नसल्याचे सांगितले.

आयसीसीने बांगलादेशला विचार करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. मात्र बीसीबी आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यांनी आपल्या लढती श्रीलंकेत खेळवण्याचा प्रस्ताव आयसीसीपुढे ठेवला आहे. त्यामुळे आता आयसीसी बांगलादेशवर कारवाई करून त्यांना विश्वचषकातून काढणार, असेच दिसते आहे. स्कॉटलंड या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.

“आमच्या संघातील खेळाडू विश्वचषकासाठी मेहनत घेत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. तसेच विश्वचषकानिमित्त बांगलादेशमधील पत्रकार, प्रेक्षकही भारतात जातील. त्यांना तेथे धोका उद्भवू शकतो. अशा स्थितीत आम्ही बांगलादेशचा संघ भारतात लढती खेळण्यासाठी न पाठवण्यावर ठाम आहोत,” असे बीसीबीचे क्रीडा सल्लागार आसिफ नुझरुल म्हणाले. बीसीसीच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यामध्ये यासंबंधी पुन्हा चर्चा करण्यात आली. यावेळी बांगलादेश संघातील तांझिद हसन, नजमूल शांतो, जेकर अली, शमिम होसेन हे खेळाडू उपस्थित होते.

बांगलादेशचा संघ विश्वचषकासाठी क-गटात आहे. त्यांना इंग्लंड, इटली, वेस्ट इंडिज व नेपाळ यांच्याविरुद्ध साखळी सामने खेळायचे आहेत. बांगलादेशच्या दोन लढती कोलकातामध्ये, तर एक सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तसेच मुस्तफिझूरला आयपीएलमधून बाहेर करत बीसीसीआयने खेळात राजकारण आणले आहे, अशी तक्रारही बीसीबीने आयसीसीकडे केली आहे. आयसीसी यावर पुढील काही दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित आहे. कारण आता विश्वचषकासाठी फक्त १५ दिवस शिल्लक आहेत.

पाकिस्तानचा बांगलादेशला पाठिंबा

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बांगलादेशला पाठिंबा दर्शवला आहे. बांगलादेशचे सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यासाठी आपण तयार असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र आयसीसी त्यासाठी परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने दुबईत झाले होते. तसेच पाकिस्तानचा महिला संघही विश्वचषकासाठी भारतात आला नव्हता. २०२७पर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये हा करार कायम असेल.

रिकल्टन, स्टब्स अखेर आफ्रिकेच्या संघात

दक्षिण आफ्रिकेने डावखुरा सलामीवीर रायन रिकल्टन व प्रतिभावान ट्रिस्टन स्टब्स यांना आगामी टी-२० विश्वचषकासाठी अखेर संघात स्थान दिले आहे. तीन आठवड्यांपूर्वी जाहीर केलेल्या संघात टॉनी डी झॉर्झी व डोनोवन फरेरा यांचा समावेश होता. त्यामुळे अनेकांनी निवड समितीवर टीकादेखील केली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या आफ्रिका टी-२० लीगमध्ये रिकल्टन व स्टब्स यांनी सातत्याने छाप पाडली. तसेच टॉनी व फरेरा जायबंदी झाल्याने रिकल्टन व स्टब्सच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला.

logo
marathi.freepressjournal.in