बांगलादेशची नकारघंटा! टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात प्रवास करण्यास नकार; ICC ला पत्र पाठवले

केकेआरने मुस्तफिझूरला संघाबाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आपला संघ पाठवण्यास नकारघंटा दर्शवली आहे.
बांगलादेशची नकारघंटा! टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात प्रवास करण्यास नकार; ICC ला पत्र पाठवले
Photo : X
Published on

ढाका : भारत आणि बांगलादेश या दोन देशांतील संबंध ताणले गेल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलमधून मुस्तफिझूर रहमानला मुक्त करण्याच्या सूचना कोलकाता नाइट रायडर्सला दिल्या होत्या. केकेआरने मुस्तफिझूरला संघाबाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आपला संघ पाठवण्यास नकारघंटा दर्शवली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव तसेच बांगलादेश सरकारच्या सल्ल्यानुसार, बांगलादेशने आपला संघ भारतात पठावण्यास नकार दिला आहे. तशा आशयाचे पत्र बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पाठवले आहे. केकेआरने मुस्तफिझूर रहमानला मुक्त केल्यानंतर बांगलादेशने शनिवारी रात्री आपत्कालीन बैठक बोलावली होती. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसेच क्रीडा सल्लागार डॉ. आसिफ नझरूल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनंतर, बीसीबीने आयसीसकडे बांगलादेशचे सामने अन्यत्र हलवण्याची विनंती केली होती.

“बांगलादेश क्रिकेट बोर्ड सद्यस्थितीची चाचपणी करत आहे. गेल्या २४ तासांत ज्या काही घडामोडी घडल्या, त्यावरून बांगलादेश संघाचे भारतात होणाऱ्या सामन्यांत खेळणे अवघड होऊन बसले आहे. भारतात बांगलादेशच्या खेळाडूंना धोका निर्माण होईल, असे वातावरण असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही भारतात आमचा संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकार तसेच बीसीबीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे,” असे बीसीबीच्या पत्रकात म्हटले आहे. भारत आणि श्रीलंका टी-२० वर्ल्डकपचे संयुक्त आयोजक आहेत.

बांगलादेशचे चार साखळी सामने भारतात होणार असल्यामुळे आयसीसीला याप्रकरणी तोडगा काढावा लागणार आहे. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशनेही आपले सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. “आम्ही आमचे सर्व सामने भारताबाहेर म्हणजेच श्रीलंकेत खेळवण्यासाठी आयसीसीकडे विचारणा केली आहे. आयसीसीने सद्यस्थितीचे अवलोकन करून याप्रकरणी तत्काळ प्रतिसाद द्यावा,” असेही या पत्रकात म्हटले आहे.

“टी-२० वर्ल्डकपसाठी बांगलादेशचा संघ भारतात जाणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रविवारी याबाबतचा निर्णय घेतला आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो,” असे क्रीडा सल्लागार आसिफ नझरूल यांनी म्हटले आहे. बीसीसीच्या तातडीच्या बैठकीनंतर नझरूल यांनी बांगलादेशचे चार सामने (कोलकातातील तीन आणि मुंबईतील एक) हलवण्याची मागणी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्याकडे केली आहे. बांगलादेश क्रिकेटचा, क्रिकेटपटूंचा अपमान सहन केला जाणार नाही. बांगलादेशात आयपीएलचे प्रसारण होऊ नये यासाठी सूचना दिल्या आहेत. गुलामीचे दिवस सरले. आता असे चालणार नाही, असेही असिफ यांनी म्हटले आहे.

बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर होणारे हल्ले आणि अत्याचार या पार्श्वभूमीवर भारतात बांगलादेशविरुद्ध नाराजीचा सूर आहे. त्यामुळेच आयपीएल स्पर्धेत बांगलादेशच्या खेळाडूंना खेळवू नये, अशी टीका वारंवार बीसीसीआयवर होत होती. लोकांच्या भावना लक्षात घेऊन बीसीसीआयने यंदाच्या हंगामातील बांगलादेशचा एकमेव खेळाडू मुस्तफिझूर रहमानला मुक्त करण्याचे आदेश त्याच्या केकेआर फ्रँचायझीला दिले होते. शाहरूख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघानेही या निर्देशाचे पालन करत मुस्तफिझूरला मुक्त केले होते.

बांगलादेशमध्ये आयपीएल प्रसारणावर बंदी?

बांगलादेशचे कायदा आणि न्याय सल्लागार आसिफ नझरूल यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत बांगलादेशमध्ये आयपीएल २०२६ चे सर्व कव्हरेज आणि प्रक्षेपण थांबवण्यात यावे, अशी विनंती बांगलादेश सरकारला केली आहे. या प्रकरणावर बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण सल्लागार सय्यदा रिझवाना हसन यांनीही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “दुर्दैवाने खेळांमध्ये आता राजकारण शिरले आहे. खेळ दोन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी असतात, पण येथे उलट घडताना दिसत आहे.” भारत आणि बांगलादेशमधील सद्यस्थिती पाहता सरकार कायदेशीर बाजू तपासून आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्याबाबत गंभीर विचार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशचा संघ जाहीर

बांगलादेशने भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळण्यास नकार दिला असला तरी, दुसरीकडे त्यांनी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणाही केली. या संघाची धुरा लिटन दासकडे सोपवण्यात आली आहे. बांग्लादेश ७ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. त्यानंतर ९ फेब्रुवारीला इटलीशी, तर १४ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे. हे तिन्ही सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. याशिवाय, बांगलादेशचा गट साखळीतील अखेरचा सामना नेपाळविरुद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे.

बांगलादेशचा संघ : लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसेन, सैफ हसन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, नुरुल हसन, मेहदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, शैफुद्दीन, शरीफुल इस्लाम.

logo
marathi.freepressjournal.in