बांगलादेशची विजयी सलामी; तस्कीन अहमद सामनावीर

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड‌्सचा संघ २० षटकांत १३५ धावांत गारद झाला.
बांगलादेशची विजयी सलामी; तस्कीन अहमद सामनावीर

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत विजयी सुरुवात करताना बांगलादेशने नेदरलँड्सवर ९ धावांनी विजय मिळविला. नेदरलँड‌्सच्या संघाने कडवी झुंज दिली; पण सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले. २५ धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्स घेणाऱ्या बांगलादेशच्या तस्कीन अहमदला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड‌्सचा संघ २० षटकांत १३५ धावांत गारद झाला. नेदरलँड‌्सने अवघ्या ३.४ षटकांतच १५ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स गमावल्या. तरीही त्यांनी सहजासहजी हार न पत्करता कडवी लढत दिली.

कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने (२४ चेंडूंत १६) कॉलिन ॲकरमॅनला साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु स्कॉट बाराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. एडवर्ड्सला शाकिब अल हसनने हसन मेहमूदच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. १६.५ षटकांनंतर नेदरलँड‌्सची अवस्था ९ बाद १०१ अशी झाली. तरीही नेदरलँड‌्सने बांगलादेशला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. पॉल वान मीकेरेनने (१४ चेंडूंत २४) वेगाने धावा फटकाविण्याचा प्रयत्न केला. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

नेदरलँड‌्सकडून कॉलिन ॲकरमॅनने ४८ चेंडूंत ६२ धावा फटकाविताना सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. नेदरलँड‌्सचे अन्य फलंदाज दमदार कामगिरी करू शकले नाहीत. बांगलादेशच्या तस्कीन अहमदने चार षटकांत २५ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स घेतल्या.

त्याआधी, नेदरलँड‌्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने २० षटकांत आठ विकेट गमावत १४४ धावा केल्या. नेदरलँड‌्ससारख्या कमजोर संघासमोर मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना अपयश आले. एकही फलंदाज अर्धशतक झळकावू शकला नाही. बांग्ालादेशकडून अफिक हुसैनने २७ चेंडूंत सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in