बंगळुरू : महिला आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) दुसऱ्या पर्वाला शुक्रवारी बादशाही थाटात सुरुवात झाली. बॉलीवडूचा बादशहा शाहरूख खान, सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, वरुण धवन, टायगर श्रॉफ यांसारख्या अभिनेत्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहूल चार चाँद लावले. विशेषत: पाचही संघांच्या कर्णधारांनी मंचावर शाहरूखच्या साथीने विविध गाण्यांवर ठेका धरला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ४ गडी राखून अखेरच्या चेंडूवर मात केली.
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारपासून महिला आयपीएलचे दुसरे पर्व सुरू झाले. पाच संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता मुंबई आणि गतउपविजेता कॅपिटल्स या संघांत झाला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीने २० षटकांत ५ बाद १७१ अशी दमदार धावसंख्या उभारली.
शफाली वर्मा (१) स्वस्तात बाद झाली. मात्र कर्णधार मेग लॅनिंग (३१) व एलिस कॅप्सी (५३ चेंडूंत ७५ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. कॅप्सीने ८ चौकार व ३ षटकारांसह दमदार अर्धशतक साकारले. त्याशिवाय मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने २४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा फटकावल्या. मुंबईकडून अमेलिया कर व नॅट शीव्हर-ब्रंटने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका भाटिया (४५ चेंडूंत ५७) आणि हरमनप्रीत (३४ चेंडूंत ५५) यांनी मुंबईकडून अर्धशतके झळकावली. सलामीवीर हायली मॅथ्यूज शून्यावरच माघारी परतली. तसेच ब्रंटही (१९) अपयशी ठरली. मात्र त्यापूर्वी तिने यास्तिकासह दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. मग यास्तिका व हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भर घातली. यास्तिका बाद झाल्यावर हरमनप्रीतने किल्ला लढवला. मात्र २ चेंडूंत ५ धावांची आवश्यकता असताना ती बाद झाली. अखेर पदार्पण करणाऱ्या सजीवन सजनाने अखेरच्या चेंडूवर अफलातून षटकार लगावून मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व यूपी वॉरियर्स यांच्यातील सामना ७.३० वाजता सुरू होईल.