महिलांच्या आयपीएलची रणधुमाळी! आजपासून रंगणार WPL चे तिसरे पर्व; सलामीच्या लढतीत गतविजेत्या बंगळुरूची गुजरातशी गाठ

एकीकडे क्रीडाप्रेमींना पुरुषांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता लागलेली असतानाच दुसऱ्या बाजूला चर्चा सुरू आहे ती महिलांची आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल).
महिलांच्या आयपीएलची रणधुमाळी! आजपासून रंगणार WPL चे तिसरे पर्व; सलामीच्या लढतीत गतविजेत्या बंगळुरूची गुजरातशी गाठ
एक्स @wplt20
Published on

वडोदरा : एकीकडे क्रीडाप्रेमींना पुरुषांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता लागलेली असतानाच दुसऱ्या बाजूला चर्चा सुरू आहे ती महिलांची आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल). वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर शुक्रवार, १४ फेब्रुवारीपासून डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. यंदा चार शहरांत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या लढतीत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गुजरात जायंट्स संघाशी गाठ पडणार आहे.

पुरुषांची आयपीएल २००८मध्ये सुरू झाल्यानंतर महिलांच्या आयपीएलसाठी २०२३ पर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागली होती. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेद्वारे भारतीय महिला क्रिकेटला असंख्य प्रतिभावान खेळाडू गवसले आहेत. श्रेयांका पाटील, साइका इशाक, सजीवन सजना ही यांपैकीच काही नावे. यापूर्वी चार वेळा महिलांची चॅलेंजर स्वरूपाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र २०२३मध्ये भारताने प्रथमच १९ वर्षांखालील महिलांचा टी-२० विश्वचषक उंचावला. त्यामुळे महिलांच्या आयपीएलला प्रेरणा मिळाली. आता २०२५च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतातच रंगणार आहे. त्यामुळे डब्ल्यूपीएलमधील कामगिरी त्या संघातील खेळाडूंच्या निवडीच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकेल.

२०२३पासून आयोजित करण्यात येणाऱ्या डब्ल्यूपीएलमध्ये यंदाही पाच संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स, बंगळुरू, गुजरात, यूपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स या पाच संघांमध्ये झळाळत्या ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. २०२३मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने पहिल्या पर्वाचे जेतेपद काबिज केले. त्यावेळी पूर्णपणे मुंबईत स्पर्धा आयोजित करण्यात आली. २०२४मध्ये मग दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये ही स्पर्धा रंगली. त्यावेळी स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने बाजी मारली. यंदा दिल्ली, गुजरात किंवा यूपीपैकी कोणी प्रथमच जेतेपद मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली (मेग लॅनिंग) या तीन संघांनी गेल्या दोन हंगामांपासून आपले कर्णधार कायम राखले आहेत, मात्र यूपीचे नेतृत्व यावेळी भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा, तर गुजरातचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ॲश्लेघ गार्डनर करणार आहे.

१४ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत स्पर्धेचे साखळी सामने होणार आहेत. त्यानंतर १३ मार्च रोजी एलिमिनेट, तर १५ मार्चला अंतिम सामना खेळवण्यात येईल. स्पर्धेचे शेवटचे चार सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवणारे खेळाडू यंदा डब्ल्यूपीएलचा भाग असल्याने चाहत्यांचे स्पर्धेकडे लक्ष लागून असेल. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारतीय संघाच्या सामन्यांच्या दिवशी प्रेक्षकांचा विचार करून डब्ल्यूपीएलमध्ये विश्रांतीचा दिवसही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा क्रीडारसिक डब्ल्यूपीएलचा अधिक आनंद लुटतील, अशी अपेक्षा आहे.

स्पर्धेचे स्वरूप कसे?

- गतवर्षीप्रमाणे यंदाही पाच संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत एकूण २२ सामने खेळवण्यात येतील.

- यावेळी मुंबई, लखनऊ, वडोदरा, बंगळुरू या चार शहरांत डब्ल्यूपीएलचे सामने आयोजित करण्यात येतील.

- एका संघाला प्रत्येकी ८ सामने म्हणजेच सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी दोनदा खेळायचे आहे. साखळी फेरीअखेरीस अग्रस्थानावरील संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

- दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संघात एलिमिनेटर लढत होईल. चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील संघाचे आव्हान संपुष्टात येईल.

- सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार असून स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲपवर चाहत्यांना थेट प्रक्षेपण पाहता येईल.

मुंबई इंडियन्सचे सामने

शनिवार, १५ फेब्रुवारी वि. दिल्ली कॅपिटल्स

मंगळवार, १८ फेब्रुवारी वि. गुजरात जायंट्स

शुक्रवार, २१ फेब्रुवारी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

बुधवार, २६ फेब्रुवारी वि. यूपी वॉरियर्स

शुक्रवार, २८ फेब्रुवारी वि. दिल्ली कॅपिटल्स

गुरुवार, ६ मार्च वि. यूपी वॉरियर्स

सोमवार, १० मार्च वि. गुजरात जायंट्स

मंगळवार, ११ मार्च वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

ब्रेबॉर्नवर होणारे सामने

सोमवार, १० मार्च, मुंबई वि. गुजरात

मंगळवार, ११ मार्च, मुंबई वि. बंगळुरू

गुरुवार, १३ मार्च, एलिमिनेटर

शनिवार, १५ मार्च, अंतिम फेरी

वस्त्रकार, शोबना, हीली स्पर्धेबाहेर

मुंबईची अष्टपैलू पूजा वस्त्रकार, बंगळुरूची फिरकीपटू आशा शोबना आणि यूपीची सलामीवीर एलिसा हीली यंदा दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होणार नाही. पूजाच्या जागी मुंबईने १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाची फिरकीपटू पारुणिका सिसोदियाला संधी दिली आहे. शोबनाच्या जागी बंगळुरूने नुझत परवीनला घेतले आहे. यूपीने वेस्ट इंडिजच्या चिन्ली हेन्रीला स्थान दिले. त्याशिवाय सोफी डिवाईन, केट क्रॉस यासुद्धा विविध कारणास्तव यावेळी स्पर्धेचा भाग नसतील.

सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता सुरू होतील. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in