
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सोमवारी (दि.२१) केंद्रीय वार्षिक करारात समावेश झालेल्या खेळांडूंची यादी जाहीर केली. यातील सर्वोच्च दर्जाच्या अर्थात ए + ग्रेडमध्ये काहीही बदल झालेला नाही. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर, मागील हंगामात करार मिळवण्यात अपयशी ठरलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचेही कमबॅक झाले आहे. दोघांना अनुक्रमे ग्रेड बी आणि ग्रेड सीमध्ये स्थान दिलं गेलं आहे. तर, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला ग्रेड ए मध्ये बढती मिळाली आहे. यापूर्वी २०२३-२४ च्या हंगामात भीषण अपघात झाल्यामुळे खेळता न आल्याने पंतला समावेश ग्रेड बीमध्ये ठेवण्यात आले होते.
हे केंद्रीय वार्षिक करार १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी लागू आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी अय्यर हजर राहिला नव्हता, त्याने दुखापतीचं कारण सांगितलं होतं, तर ईशान किशनने थोडा ब्रेक घेतल्यानंतर झारखंडसाठी रणजी ट्रॉफीतून स्वतःहून माघार घेतली होती.
पहिल्यांदाच करार मिळालेले खेळाडू -
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शानदारी कामगिरी केल्याचं बक्षिस फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यालाही मिळाले आहे. त्याची पहिल्यांदाच केंद्रीय करार प्राप्त खेळाडूंमध्ये एंट्री झाली आहे. हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप आणि अभिषेक शर्मा यांनाही पहिल्यांदाच केंद्रीय करार मिळाला आहे. रविचंद्रन अश्विनने डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे त्याचे नाव यादीत नाही. याशिवाय, शार्दुल ठाकूर, केएस भरत, जितेश शर्मा आणि आवेश खान यांनीही केंद्रीय करार गमावलाय.
BCCI कडून ग्रेडनुसार मिळणारे वेतन:
BCCIच्या धोरणानुसार, ज्यांनी दिलेल्या कालावधीत किमान ३ कसोटी, ८ वनडे किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यांचा समावेश ग्रेड सीमध्ये आपोआप केला जातो.
ग्रेड A+ मधील खेळाडूंना ₹७ कोटी रुपये वार्षिक मानधन दिलं जातं.
ग्रेड A मधील खेळाडूंना ₹५ कोटी रुपये मिळतात.
ग्रेड B खेळाडूंना ₹३ कोटी रुपये दिले जातात.
ग्रेड C मधील खेळाडूंना ₹१ कोटी रुपये वार्षिक मानधन दिलं जातं.
हे वेतन केवळ केंद्रीय करारासाठी असते आणि त्याशिवाय सामनागणिक फी, बोनस, ब्रँड एंडोर्समेंट्स वगैरे स्वतंत्र असतात.
कोण कोणत्या ग्रेडमध्ये?
ग्रेड A+: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
ग्रेड A: मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत
ग्रेड B: सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर
ग्रेड C: रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.