

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रात्री नवी दिल्ली येथे पार पडला. यावेळी भारताचा टी-२० विश्वचषक विजेता पुरुष संघ, एकदिवसीय विश्वचषक विजेता वरिष्ठ महिला संघ, १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता पुरुष व महिला संघ या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
बीसीसीआयकडून दरवर्षी ‘नमन’ नावाने प्रचलित असलेल्या पुरस्कार सोहळ्यात वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव केला जातो. यावेळी शुभमन गिलला वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, तर स्मृती मानधनाला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले. तसेच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने नुकताच टी-२० विश्वचषक उंचावल्याने त्या संघाचा गौरव करण्यात आला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात विश्वचषक पटकावणारा महिला संघ, मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात १९ वर्षांखालील भारतीय संघ, तर निक्की प्रसादच्या नेतृत्वात भारतीय युवतींचा संघ यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनला सलग तिसऱ्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघटनेचा पुरस्कार देण्यात आला. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी हा पुरस्कार बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांच्याकडून स्वीकारला.
दरम्यान, यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी तसेच भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची हॅटट्रिक
मुंबई क्रिकेट असोसिएशनला सलग तिसऱ्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघटनेचा पुरस्कार देण्यात आला. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी हा पुरस्कार बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांच्याकडून स्वीकारला. यावेळी सचिव उन्मेश खानविलकरदेखील उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत एमसीने देशांतर्गत क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तसेच वानखेडे स्टेडियमवर विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. हा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी भारताच्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे व टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासह एकत्रित छायाचित्र काढले. आयुष व सूर्यकुमार दोघेही मुंबईकर असून ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.