इशान, श्रेयसला बीसीसीआयचा दणका; आदेशाचे पालन न केल्यामुळे वार्षिक करार यादीतून वगळले

इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदाजांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जबरदस्त दणका दिला
इशान, श्रेयसला बीसीसीआयचा दणका; आदेशाचे पालन न केल्यामुळे वार्षिक करार यादीतून वगळले

नवी दिल्ली : इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदाजांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जबरदस्त दणका दिला आहे. बीसीसीआयने बुधवारी जाहीर केलेल्या वार्षिक करार यादीतून इशान व श्रेयस या दोघांनाही वगळले. प्रतिभावान डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालला मात्र प्रथमच या यादीत स्थान लाभले असून त्याने थेट ब-श्रेणीत मजल मारली आहे, तर युवा शुभमन गिलला अ-श्रेणीत बढती देण्यात आली आहे.

२५ वर्षीय डावखुरा फलंदाज इशान व २९ वर्षीय मधल्या फळीतील मुंबईकर फलंदाज श्रेयस यांना रणजी स्पर्धेत खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच अशा खेळाडूंवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटकडे दुर्लक्ष करून आयपीएलसारख्या टी-२० स्पर्धांद्वारे अधिक पैसे कमावण्यासह भारतीय संघात स्थान मिळवण्याचा या क्रिकेटपटूंचा विचार आहे, असे यावरून सिद्ध होते. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेसुद्धा यापुढे जे कसोटी क्रिकेट खेळू इच्छितात. ज्यांना रणजीत खेळण्याची इच्छा आहे, त्यांनाच भारतीय संघात प्राधान्य देण्यात येईल, असे म्हटले होते. अखेर बीसीसीआयने या सर्व बाबींचा अभ्यास करून इशान व श्रेयसविरोधात ठोस पाऊल उचलले आहे. बुधवारी बीसीसीआयने प्रकाशित केलेल्या पत्रकात इशान व श्रेयस यांचा वार्षिक करारासाठी विचार करण्यात आलेला नाही, असे स्पष्टपणे नमूद केले. गतवर्षी श्रेयसचा ब-श्रेणीत, तर इशानचा क-श्रेणीत समावेश होता.

इशानने मानसिक ताणाचे कारण देत भारताच्या आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. २८ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो अखेरचा सामना खेळला होता. दरम्यानच्या काळात इशान क्लबमध्ये पार्टी करताना दिसला होता. तसेच त्याने रणजी स्पर्धेत झारखंडकडून खेळण्याचे टाळून बडोदा येथे हार्दिक पंड्यासह टी-२० स्पर्धेसाठी सराव केला. सध्या तो व हार्दिक दोघेही डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत खेळत आहे. हार्दिक मात्र पायावरील शस्त्रक्रियेतून सावरत होता, तसेच तो भारताच्या कसोटी संघाचा गेल्या अनेक वर्षांपासून भाग नाही.

दुसरीकडे श्रेयसला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांना मुकावे लागले. तसेच तो रणजीच्या उपांत्यपूर्व सामन्यातही खेळला नाही. मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) वैद्यकीय पथकाने श्रेयस खेळण्यास तंदुरुस्त आहे, असे सांगितले. त्यानुसार श्रेयसने रणजी स्पर्धेत खेळणे अपेक्षित होते. आता तो उपांत्य सामन्यात नक्कीच खेळणार आहे. मात्र तरीही त्याची वार्षिक करारातून गच्छंती करण्यात आली आहे.

करारातील अन्य मुद्यांचा विचार करता भारताचा कर्णधार रोहित शर्मा, तारांकित फलंदाज विराट कोहली, आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा या चौघांना गतवर्षी प्रमाणेच यंदाही अ+ (ए प्लस) श्रेणीत स्थान लाभले आहे. त्यांना वार्षिक ७ कोटी मानधन देण्यात येईल. २२ वर्षीय यशस्वीने अल्पावधीतच छाप पाडल्याने त्याला ३ कोटी मानधन असलेल्या ब-श्रेणीत स्थान लाभले. तसेच गतवर्षी ब-श्रेणीत असलेला गिल यावेळी अ-श्रेणीत (५ कोटी) दाखल झाला आहे. के. एल. राहुल व मोहम्मद सिराज यांनीही ब-श्रेणीतून अ-श्रेणीत स्थान मिळवले आहे. १ ऑक्टोबर, २०२३ ते ३० सप्टेंबर, २०२४ या कालावधीसाठी ही करार यादी जाहीर करण्यात आली आहे.

सर्फराझ, जुरेलही ठरणार पात्र

बीसीसीआयने नमूद केलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबरदरम्यान ३ कसोटी, ८ एकदिवसीय व १० टी-२० या तिघांपैकी एकाही अटीत एखादा खेळाडू येत असेल, तर तो वार्षिक करारातील क-श्रेणीसाठी पात्र ठरेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत छाप पाडणारे सर्फराझ खान व ध्रुव जुरेल हे दोन कसोटी सामने खेळलेले आहेत. त्यामुळे ते मालिकेतील पाचवी कसोटी खेळल्यास त्यांचाही क-श्रेणीत समावेश करण्यात येईल.

कसोटीपटूंचे मानधन वाढवण्याचा विचार

वर्षभरात भारताच्या सर्व कसोटी सामन्यांसाठी तंदुरुस्त राहणाऱ्या क्रिकेटपटूंना मानधन वाढ करून मिळणार आहे, असे समजते. यामुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व आणखी अधोरेखित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. सध्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला एका कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख, तर टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. याव्यतिरिक्त, त्यांना बीसीसीआयच्या वार्षिक कराराची रक्कम वेगळी देण्यात येते.

हे नक्की वाचा!

- बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत एकूण ३० खेळाडूंचा समावेश आहे. यांपैकी ४ जण हे ‘अ+’ श्रेणीत, ६ जण अ-श्रेणीत, ५ जण ब-श्रेणीत, तर १५ खेळाडू क-श्रेणीत आहेत.

- युझवेंद्र चहल, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंना कोणत्याही श्रेणीत स्थान लाभलेले नाही.

- आकाश दीप, विजयकुमार वैशाख, उमरान मलिक, यश दयाल व विद्वत कॅवेरप्पा या वेगवान गोलंदाजांनाही वेगळा करार देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

- राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत नसताना खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

करारबद्ध खेळाडूंची यादी

- ‘अ+’ श्रेणी (७ कोटी) : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा.

- ‘अ’श्रेणी (५ कोटी) : रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी.

- ‘ब’श्रेणी (३ कोटी) : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल.

- ‘क’श्रेणी (१ कोटी) : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के. एस. भरत, प्रसिध कृष्णा, आवेश खान, रजत पाटिदार.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in