BCCI ची नक्वींविरोधात तक्रार! आता ICC च्या भूमिकेकडे लक्ष; नक्वींचा मात्र भारताला चषक देण्यास नकार कायम

आशिया चषक विजयानंतर भारतीय संघाला ट्रॉफी न दिल्यामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याविरोधात तक्रार दाखल करून बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला व माजी खजिनदार आशिष शेलार यांनी वार्षिक सभेत या प्रकाराचा निषेध केला.
BCCI ची नक्वींविरोधात तक्रार! आता ICC च्या भूमिकेकडे लक्ष; नक्वींचा मात्र भारताला चषक देण्यास नकार कायम
Published on

दुबई : आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मंगळवारी झालेल्या एसीसीच्या वार्षिक सभेत बीसीसीआयच्या वतीने उपाध्यक्ष राजीव शुक्ला व माजी खजिनदार आशिष शेलार यांनी नक्वींच्या कृत्याचा निषेध केला.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने रविवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला ५ गडी व २ चेंडू राखून पराभूत केले. भारताने एकंदर नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली. मात्र भारताच्या विजयापेक्षा त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींची सगळीकडे अधिक चर्चा सुरू आहे. भारताने स्पर्धा जिंकल्यानंतर नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास मनाई केली. नक्वी हे पाकिस्तानचे मंत्री असून तेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्षही आहेत.

संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. त्याचप्रमाणे पाकिस्तानी मंत्र्यांच्या हातून चषकही स्वीकारला नाही. नक्वी बराच काळ मंचावर ताटकळत होते. त्यावेळी पाकिस्तानचा संघही मैदानात नव्हता, तर भारताचे खेळाडू मात्र मैदानातच बसून होते. अखेरीस एका तासाने पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला. भारताने वैयक्तिक पुरस्कार अन्य पदाधिकाऱ्यांच्या हातून घेतली. मात्र जेतेपदाचा चषक आपणच देणार, यावर नक्वी ठाम होते. शेवटी नक्वी अन्य कुणाच्या हातून भारताला चषक देण्यास तयार झाले नाही व ते चषक घेऊनच माघारी परतले. त्यामुळे भारताने स्वत:च चषकाच्या आभासी प्रतिकृतीसह जल्लोष केला. भारताच्या या कृत्यावर सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे, तर पाकिस्तानला भरपूर ट्रोल केले जात आहे.

“एसीसीच्या बैठकीत आम्ही नक्वी यांच्या कृत्याचा कडाडून विरोध केला आहे. तसेच शुक्ला व शेलार यांनी बीसीसीआयच्या वतीने नक्वी यांना चषक व खेळाडूंची पदके लवकर द्यावीत, असे आदेश दिले आहेत. आयसीसीच्या बैठकीतसुद्धा आम्ही यावर मत मांडणार आहोत,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला नक्वी यांनी नेपाळ संघाचे अभिनंदन केले. नेपाळने नुकताच वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र शेलार यांनी नक्वी यांना भारतीय संघाचे अभिनंदन करण्यास भाग पाडले. त्यानंतर नक्वी यांनी भारतीय संघाचे आशिया चषक जेतेपदासाठी अभिनंदन केले. त्यामुळे आता नक्वी कधी भारताला चषक देणार, हे पाहणे रंजक ठरणार असून हे प्रकरण आणखी काही दिवस ताणले जाण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स भारतात परतले आणि कसोटीच्या तयारीला लागले

भारताचे आशिया चषक विजेते खेळाडू सोमवारी मध्यरात्री मायदेशी परतले. कर्णधार सूर्यकुमारचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी तिलकचेदेखील हैदराबाद येथे जंगी स्वागत करण्यात आले. प्रशिक्षक गौतम गंभीर व भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल थेट अहमदाबादसाठी रवाना झाले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिज यांच्यात गुरुवार, २ ऑक्टोबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. आशिया चषकाचा भाग नसलेल्या खेळाडूंच्या सरावाला काही दिवसांपूर्वीच प्रारंभ झाला. मंगळवारी जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल व कुलदीप यादव या गोलंदाजांनी मात्र सराव करणे टाळले. बुधवारी भारताचे सर्व खेळाडू सराव करतील, असे अपेक्षित आहे.

जोसेफ दुखापतीमुळे मालिकेबाहेर

वेस्ट इंडिजच्या संघाला लागलेले दुखापतींचे ग्रहण अद्याप कायम आहे. शामर जोसेफनंतर आता अल्झारी जोसेफच्या रूपात त्यांचा आणखी एक वेगवान गोलंदाज भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे २३ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज जेदिया ब्लेड्सचा विंडीजच्या संघात समावेश करण्यात आला आहे. जेसन होल्डरला प्रथम संघात येण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र वैयक्तिक कारणास्तव त्याने यास नकार दिला. त्यामुळे ब्लेड्सला संधी देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in