

मुंबई : काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडवर मात करून टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला रविवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक 'नमन पुरस्कार' सोहळ्यात गौरवले जाणार आहे. आयसीसी स्पर्धांची विजेतेपदे पटकावणाऱ्या पाच भारतीय संघांचा या सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे.
गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या सूर्यकुमारच्या टीम इंडियाने न्यूझीलंडला ९६ धावांनी सहजपणे धूळ चारत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरले. टी-२० वर्ल्डकप तिसऱ्यांदा जिंकणारा तसेच लागोपाठ दोन विजेतेपदे पटकावणारा आणि मायदेशात ही स्पर्धा जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला. त्याचबरोबर भारतीय महिला संघाने २०२५मध्ये एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय पुरुष संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील विश्वचषकाला गवसणी घातली तसेच महिलांच्या १९ वर्षांखालील संघानेही टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला. या सर्व संघांचा सन्मान बीसीसीआयतर्फे केला जाणार आहे.
बीसीसीआयने शनिवारी वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांच्या नावांचीही घोषणा केली. भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याला २०२४-२५ मोसमाताली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरल्याबद्दल पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरवण्यात येईल. स्मृती मानधना हिला कारकीर्दीत पाचव्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर ठरल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.
इरा जाधव हिला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा मान मिळवल्याबद्दल जगमोहन दालमिया करंकडाने गौरवण्यात येईल. शफाली वर्मा ही वरिष्ठ महिला क्रिकेटमध्ये वनडे प्रकारात सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली होती. त्यामुळे तिचाही गौरव करण्यात येईल. मुंबईकर आयुष म्हात्रे हा झटपट क्रिकेटमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला होता. त्याचा लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मान केला जाईल. विदर्भच्या हर्ष दुबे याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता. त्यालाही या सोहळ्यात गौरविले जाईल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत यंदाच्या मोसमात आपली छाप पाडली. बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा एमसीएचा संघ ठरला. मुंबईने चार विजेतेपदे आणि दोन स्पर्धांमध्ये उपविजेतेपदाचा मान मिळवला. त्याचबरोबर मुंबई क्रिकेट झालेल्या टी-२० विश्वचषकाचे असोसिएशनला नुकत्याच संपन्न यशस्वीपणे आयोजन केल्यामुळेही गौरवण्यात येणार आहे.