BCCI ने महिला क्रिकेटसाठी उचलले आणखी एक पाऊल; ६ वर्षांनी पुन्हा होणार 'ही' मोठी स्पर्धा; पुण्यात २८ मार्चपासून सुरूवात

बीसीसीआयने महिला क्रिकेटच्या प्रगतीच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलले आहे.
BCCI ने महिला क्रिकेटसाठी उचलले आणखी एक पाऊल; ६ वर्षांनी पुन्हा होणार 'ही' मोठी स्पर्धा; पुण्यात २८ मार्चपासून सुरूवात

नवी दिल्ली : बीसीसीआयने महिला क्रिकेटच्या प्रगतीच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलले आहे. पुरुषांच्या रणजी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आता महिलांसाठी लाल चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेचे तब्बल सहा वर्षांनी पुन्हा आयोजन करण्यात येणार आहे. २८ मार्चपासून पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवण्यात येईल.

सध्या महिलांच्या प्रीमियर लीगचे (डब्ल्यूपीएल) दुसरे पर्व सुरू असून याला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय महिला संघाने मायदेशात इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या संघांना कसोटी सामन्यात धूळ चारली. त्यामुळे महिला क्रिकेटच्या लाल चेंडूंच्या स्थानिक स्पर्धेचे पुन्हा आयोजन करण्यात यावे, अशी मागणी अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली. अखेर बीसीसीआयने याची दखल घेत २०१८नंतर प्रथमच महिलांसाठी लाल चेंडूची विभागीय स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. २०१८ मध्ये उत्तर विभागाने ही स्पर्धा जिंकली होती.

डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम १७ मार्च रोजी संपेल. त्यानंतर १० दिवसांच्या कालावधीतच ही स्पर्धा सुरू होईल. भारताच्या माजी क्रिकेटपटू डायना एडल्जी, अमिता शर्मा यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हरमनप्रीत, स्मृती मानधना यांनीही महिलांसाठी कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यासह देशांतर्गत लाल चेंडूचे सामने पुन्हा खेळवावे, असे मत नोंदवले होते. यापूर्वी, २०१४ ते २०१८च्या काळात या स्पर्धेचे चार हंगाम आयोजित करण्यात आले. मात्र त्यानंतर ही स्पर्धा बंद पडली होती.

स्पर्धेचे स्वरूप कसे?

-२८ मार्चपासून पुणे (गहुंजे) येथे स्पर्धेला प्रारंभ. ९ ते ११ एप्रिलदरम्यान अंतिम सामना.

-पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य आणि ईशान्य (नॉर्थ-ईस्ट) असे सहा संघ स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक सामना ३ दिवसांचा असेल.

-२०१८च्या स्पर्धेतील कामगिरीच्या आढाव्यानुसार दोन संघांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात येईल. अन्य चार संघांमध्ये उपांत्यपूर्व सामना होईल.

-पूर्व विरुद्ध ईशान्य आणि पश्चिम विरुद्ध मध्य या विभागांमध्ये २८ मार्चपासून उपांत्यपूर्व फेरी सुरू होईल. दक्षिण व उत्तर विभागाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. उपांत्य सामने ३ एप्रिलपासून सुरू होतील.

logo
marathi.freepressjournal.in