बेगानी शादी में

काही संघ दुबईत आधीपासूनच दाखल झालेले असल्याने त्यांना सराव करण्यास तसा बऱ्यापैकी अवधीसुद्धा मिळाला आहे
बेगानी शादी में

बहुप्रतीक्षित आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून ‘अ’ गटातील श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याने शानदार सुरुवात झाली आहे. सर्वांच्या नजरा मात्र रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित लढतीवर खिळलेल्या आहेत. दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना अपेक्षेप्रमाणेच रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे.

काही संघ दुबईत आधीपासूनच दाखल झालेले असल्याने त्यांना सराव करण्यास तसा बऱ्यापैकी अवधीसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेतील सामने सहा संघांमध्ये खेळविले जाणार आहेत. पाच संघांची निश्चिती आधीच झाली होती. त्यामुळे अर्थातच सहावा संघ पात्रता फेरीतून निवडला गेला. पात्रता फेरी जिंकत हाँगकाँगचा क्रिकेट संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दिमाखात दाखल झाला; मात्र या संघात त्यांचा स्वत:चा एकही खेळाडू नाही, हे आश्चर्यकारक आहे, निश्चितच. ‘अपना बेगाना कौन, जाना अनजाना कौन...’ हे हाँगकाँगच्या निवड समितीला कसे उमगले नाही?

विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात हाँगकाँगचा प्रवेश झाला आहे. ‘ब’ गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. आशिया चषक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरलेल्या हाँगकाँगच्या टीममधून त्या देशाचे खेळाडू नाहीत, हे आश्चर्यकारकच नव्हे; तर अक्षरशः आक्षेपार्ह आहे. स्वतःच्या देशाचा ध्वज उंचावण्यासाठी प्राणपणाने खेळणाऱ्या अन्य खेळाडूंची ही थट्टाच नव्हे का? प्रत्येक देशाच्या उदयोन्मुख खेळाडूंची आपल्या राष्ट्रध्वजासाठी खेळण्याची उत्कट इच्छा असते. अशा खेळाडूंच्या महत्त्वाकांक्षेशी हा एक प्रकारे खेळ करण्याचाच प्रमाद झाला. २१ ऑगस्टपासून पात्रता फेरीचे सामने सुरू झाले होते. हे सामने हाँगकाँग, कुवेत, यूएई आणि सिंगापूर या चार संघांमध्ये खेळवले गेले. हे संघ प्रत्येकी तीन सामने खेळले आणि त्यातून तिन्ही सामने जिंकत हाँगकाँग संघाने बाजी मारली आणि त्यांची स्पर्धेत एन्ट्री झाली. हाँगकाँगने तिन्ही लढती जिंकून सहा गुणांसह पहिले स्थान पटकावत मुख्य फेरीची पात्रता मिळविली. कुवेतचा संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. हाँगकाँग संघाने पात्रता फेरीच्या अखेरच्या लढतीत यूएई संघाला आठ गडी आणि सहा चेंडू राखून पराभूत केले आणि मुख्य फेरीत प्रवेश केला; पण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत परक्या संघासाठी उपऱ्यांनी घाम गाळणे म्हणजे, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना...’ असाच हा प्रकार आहे, म्हणा ना!

पात्रता स्पर्धेत स्वतःच्या देशाचे नाव उंचावण्यासाठी कुवेत, यूएई आणि सिंगापूरचे खेळाडू आपापल्या परीने योद्ध्याप्रमाणे लढले. त्यामुळे ‘तुम तो पराये हो, यूं ही ललचाये हो, जाने किस दुनिया से, जाने क्यों आये हो, जाने क्यों आये हो...’ असेच या लढवय्या खेळाडूंना हाँगकाँगच्या विजयी खेळाडूंचे यश पाहून वाटले असणार. खरे तर, कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची राष्ट्रनिष्ठा पणास लागत असते आणि हेच स्पर्धात्मक दर्जा राखण्यासाठी महत्त्वाचे असते. एखाद्या देशासाठी अन्य देशाच्या खेळाडूंनी १०० टक्के योगदान दिले, तरी जी क्षमता आणि उत्कटता संबंधित देशाचा नागरिक असलेल्या खेळाडूच्या कामगिरीतून आविष्कृत होत असते, तशी सर परकीय खेळाडूच्या अद्वितीय पराक्रमालाही येत नाही. शिवाय, आशिया चषक ही काही आयपीएल, पीएसएल, सीसीएल किंवा बिग बॅशसारखी देशांतर्गत लीग नाही. आशियाई क्रिकेट परिषदेने अशा संघाला पात्रता खेळी खेळण्याची मुभा देणे, हेच मुळात क्लेशदायक आहे, खरोखरच. ‘अपने दिल से पूछो, दिल को पहचाने कौन?’ अशीच त्यांची अवस्था हाँगकाँगच्या संघाला मान्यता देताना झाली होती की काय, कोण जाणे! स्पर्धेत हाँगकाँगचा संघ असला, तरी त्या टीममध्ये मूळ त्या देशाचे खेळाडू नाहीत, ही बाब मनाला अतिशय खटकणारी आहे, खचितच. परदेसीयोंसे ना अखिया मिलाना...’ हे आशियाई क्रिकेट परिषदेने संबंधित देशाला सांगायला हवे होते; परंतु हितसंबंध, अर्थसंबंध जपायचे असतील तर कोणी काय सांगायचे? जर देशात ‘टॅलन्ट’ नसेल, खेळाचा प्रसार-विकास झालेला नसेल, तर अन्य देशाच्या निष्ठावान, उदयोन्मुख खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्याशी खेळत मैदानात उतरायचेच कशाला? हाँगकाँगचा या स्पर्धेतील पहिला सामना भारताविरुद्ध ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर हाँगकाँगला २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. भारत आणि पाकिस्तान या देशाच्या खेळाडूंनी सातत्य राखले, तर उभय देशांत तब्बल तीन सामने होऊ शकतात, असे वेळापत्रक बारकाईने पाहिल्यास उमगू शकते. अशा स्थितीत हाँगकाँगची कामगिरी निर्णायक ठरू शकते, हमखास. कहर म्हणजे, हाँगकाँगच्या या टीममधून भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी देशांचे खेळाडू खेळणार आहेत. हाँगकाँगच्या १७ सदस्यीय संघात पाकिस्तानी वंशाचे तब्बल १२ खेळाडू आहेत. आता बोला! अवघे चार खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. एकमेव खेळाडू ब्रिटिश वंशाचा आहे. कर्णधार निजाकत खान, किनचित शाह, झिशान अली, हारून अर्शद, बाबर हयात, आफताब हुसेन, अतीक इक्बाल, एजाज खान, एहसान खान, यष्टिरक्षक स्कॉट मॅककेनी, गजनफर मोहम्मद, यासिम मुर्तजा, धनंजय राव, वाजिद शाह, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी, मोहम्मद वहीद हे खेळाडू हाँगकाँगच्या संघात आहेत. भारत-पाकिस्तान या उभय देशांतील सलोखा, सौहार्द या दृष्टिकोनातून हाँगकाँगच्या संघातील सर्वसमावेशकता सकारात्मक वाटत असली, तरी एखाद्या निर्णायक सामन्यात हे खेळाडू देशप्रेमापायी स्वतःच्या मूळ देशाला अनुकूल ठरणारी खेळी करणार नाहीत, कशावरून? मग एखाद्या देशाने विजेतेपद पटकाविण्याला शान आणि गौरव तो काय राहिला? पक्षपातीपणा झाला तर केल्या खेळावर विरजण पडू शकते. जीवाची बाजी लावत केलेला खेळही मग ‘पल में लुट जाता हैं, युं ही बह जाता हैं...’ हे सर्वच खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवत प्रामाणिकपणे आवर्जून ध्यानात ठेवावयास हवे. तेव्हा आता झाले ते झाले. एकदा धनुष्यातून सुटलेला बाण माघारी घेता येत नाही. परकीय खेळाडूंचा समावेश असलेल्या एखाद्या देशाच्या संघास मान्यता देणाऱ्या ‘ऐसे मनमौजी को मुश्किल हैं समझाना...’ हे जरी खरे असले, तरी किमान पुढील स्पर्धेपासून तरी अशी गफलत संबंधितांनी होऊ देता कामा नये, असे हटकून सांगावेसे वाटते, निश्चितच.

logo
marathi.freepressjournal.in