

नॉटिंगहॅम : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर स्टोक्स आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला आणि चार वर्षांच्या कसोटी कर्णधारपदाच्या कार्यकाळाला अलविदा करणार आहे.
स्टोक्सने रविवारी सकाळी खेळाला सुरुवात होण्याआधी आपले संघसहकारी आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) या निर्णयाची माहिती दिली. ड्रेसिंगरूममध्ये आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना स्टोक्स भावूक झाला होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांना उर्वरित दोन दिवसांत मैदानावर सर्वस्व पणाला लावण्याचे आवाहन केले. त्यानंतर इंग्लंडचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफने उभे राहून त्याला मानवंदना दिली. स्टोक्सने निवृत्तीचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. त्याने सहकाऱ्यांना सांगितले की, “निवृत्तीचे कारण नंतर सांगता येईल. शिस्तभंगाच्या कारवाईमुळे तो ओव्हल येथे झालेला दुसरा कसोटी सामना खेळू शकला नव्हता. लॉर्ड्स कसोटी विजयानंतरच्या सेलिब्रेशनप्रकरणी ‘ईसीबी’ आणि ‘क्रिकेट रेग्युलेटर’ने त्याची चौकशी केली होती, मात्र नंतर त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले.
ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानाच्या सत्रापूर्वी ‘ईसीबी’ने या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. स्टोक्सने १० ओव्हर्सचा दुसरा मोठा स्पेल पूर्ण केला होता. त्यानंतर तो ११ व्या ओव्हरसाठी मैदानात परतला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले आणि त्याने लगेचच जॅक फोल्क्सला स्लिपमध्ये झेलबाद केले. स्टोक्सच्या या निर्णयामुळे इंग्लंडचा कसोटी संघ मोठ्या संकटात सापडला आहे. इंग्लंडने या मालिकेपूर्वी गेल्या नऊ कसोटी सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत २०१२ नंतरचा पहिला पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला चौथ्या डावात ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.