

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळांमधील पंचांच्या देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियाचे पंच बेन ट्रेलोअर रणजी ट्रॉफीतील दोन सामन्यांत पंचगिरी करणार आहेत, तर भारताचे पराशर जोशी ऑस्ट्रेलियात जाऊन शेफिल्ड शिल्डचे दोन सामने आणि वनडे कपमधील एका सामन्यात पंच म्हणून काम पाहणार आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेलोअर १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे दिल्ली आणि गुजरात यांच्यात होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात पंचगिरी करतील. त्यानंतर २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान मुंबई येथे मुंबई आणि हरियाणा यांच्यात होणाऱ्या सामन्यात ते पंच म्हणून जबाबदारी सांभाळतील.
दरम्यान, जोशी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर होणाऱ्या क्वीन्सलँड आणि तस्मानिया यांच्यातील शेफिल्ड शिल्ड सामन्याने होईल. त्यानंतर १६ नोव्हेंबरला याच मैदानावर दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या वनडे कप सामन्यात ते पंचगिरी करतील. या कार्यक्रमातील त्यांची अखेरची नियुक्ती २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड यांच्यात होणाऱ्या शेफिल्ड शिल्ड सामन्यासाठी असेल.
ऑस्ट्रेलियाचे पंच ट्रेलोअर यांना देशांतर्गत क्रिकेटमधील पंचगिरीचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत ३० प्रथम श्रेणी सामने, २० लिस्ट ए सामने आणि बिग बॅश लीगमधील ३९ सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, दोन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि चार महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतही त्यांनी पंचगिरी केली आहे.
मैदानाबाहेर ट्रेलोअर हे क्रिकेट न्यू साऊथ वेल्समध्ये पंच शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.