रोहित-विराट सलामीसाठी उत्तम पर्याय - सुलक्षण कुलकर्णी

आशिया चषकात भारताला अंतिम फेरी गाठण्यातही अपयश आले.
रोहित-विराट सलामीसाठी उत्तम पर्याय - सुलक्षण कुलकर्णी

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारताकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरावे, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू तसेच विख्यात प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ऑस्ट्रेलिया येथे १६ ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रणधुमाळीला प्रारंभ होणार असून भारतीय संघाची घडी अद्याप व्यवस्थित बसलेली नाही, असे दिसते. आशिया चषकात भारताला अंतिम फेरी गाठण्यातही अपयश आले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये भारतीय संघ योग्य ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार के. एल. राहुल यांची जोडी सलामीस येण्याची शक्यता असली, तरी मुंबईचे माजी रणजीपटू कुलकर्णी याविरोधात आहेत.

“ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये राहुलने छाप पाडणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता; मात्र विश्वचषकापूर्वी त्याने लय न मिळवल्यास भारतासाठी ते धोक्याचे ठरू शकेल. अशा स्थितीत रोहित आणि विराट सलामीला आले, तर संघ व्यवस्थापनासाठी मधल्या फळीत प्रयोग करण्याचे असंख्य पर्याय खुले होतील,” असे ५५ वर्षीय कुलकर्णी म्हणाले.

“सूर्यकुमार यादव किंवा ऋषभ पंतपैकी एक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हार्दिक पंड्या आणि दीपक हुडा तुमचे दोन अष्टपैलू असतील. त्यानंतर फिनिशर म्हणून तुम्ही दिनेश कार्तिकची संघात निवड केली असल्याने त्याला प्रत्येक सामन्यात संधी मिळणे गरजेचे आहे,” असेही कुलकर्णी यांनी सांगितले. कुलकर्णी यांची नुकताच पंजाबच्या १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने २०१२-१३च्या रणजी हंगामाचे विजेतेपद मिळवले होते. त्याशिवाय २०१९मध्ये कुलकर्णी यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने अपंगांचा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती.

भुवनेश्वर आणि अर्शदीपपैकी एकालाच संधी!

भारताच्या गोलंदाजांच्या फळीबद्दल विचारले असता कुलकर्णी यांनी जसप्रीत बुमरा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांची निवड केली. “माझ्या मते भुवनेश्वर आणि अर्शदीपपैकी एकालाच अंतिम ११ संघात संधी मिळेल. तसेच रविचंद्रन अश्विन आणि चहल या दोघांनाही एकत्रित खेळवल्यास भारताला क्षेत्ररक्षणादरम्यान त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे अक्षर पटेलला चहलच्या साथीने खेळवावे. हार्दिक आणि हुडा तुम्हाला पाचव्या गोलंदाजाची षट्के पूर्ण करून देऊ शकतात,” असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in