ऑस्ट्रेलियाची ३११ धावांवर मजल; कोन्स्टासचे पदार्पणात अर्धशतक, बुमराची शानदार गोलंदाजी

पदार्पणवीर सॅम कोन्स्टास (६० धावा) आणि उस्मान ख्वाजा (५७ धावा) यांच्या दमदार सलामीमुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात गुरुवारी चांगली सुरुवात केली.
ऑस्ट्रेलियाची ३११ धावांवर मजल; कोन्स्टासचे पदार्पणात अर्धशतक, बुमराची शानदार गोलंदाजी
Published on

मेलबर्न : पदार्पणवीर सॅम कोन्स्टास (६० धावा) आणि उस्मान ख्वाजा (५७ धावा) यांच्या दमदार सलामीमुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात गुरुवारी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करण्यात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या दिवसाअखेर ८६ षटकांत ३११ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज माघारी परतले आहेत.

एमसीजीच्या या खेळपट्टीवर ८० हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांसमोर कोन्स्टासने ६५ चेंडूंत ६० धावांची धाडसी खेळी खेळली. त्यावेळी प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. जसप्रित बुमराने ट्रॅविस हेडला भोपळाही फोडू न देता बाद केल्यावर स्टेडियममध्ये बुम बुम बुमरा अशा घोषणा देण्यात आल्या.

कसोटी सामन्यांत पाठोपाठ शतके झळकवणाऱ्या हेडला बुमराने फेकलेल्या चेंडूची लेन्थ ओळखता आली नाही. त्याला उसळत्या चेंडूची अपेक्षा होती. मात्र बुमराने ६६.२ व्या षटकात फॉर्ममध्ये असलेल्या या फलंदाजाचा त्रिफळा उडवला.

पुढच्याच षटकात बुमराने धावांसाठी झगडणाऱ्या मिचेल मार्शला (४ धावा) मघारी धाडले. जेवणानंतर त्याने मैदानात स्थिरावलेला सलामीवीर (१२१ चेंडूंत ५७ धावा) उस्मान ख्वाजाला आपल्या सापळ्यात अडकवले.

पहिली दोन सत्रे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवली. पदार्पणवीर सॅम कोन्स्टास (६० धावा), अनुभवी उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन (१४५ चेंडूंत ७२ धावा), आणि स्टीवन स्मिथ (१११ चेंडूंत नाबाद ६८ धावा) या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली.

शेवटच्या सत्रात बुमराच्या गोलंदाजीची जादू चालली. बुमराने मालिकेत आतापर्यंत २४ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजला (१५ षटकांत ०/६९) एकही विकेट मिळवता आलेली नाही. ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरकडून बुमराला फारशी साथ मिळाली नाही. सुंदरने १२ षटकांत ३७ धावा देत १ विकेट मिळवली.

दुसऱ्यांदा नवीन चेंडू घेतला तेव्हा आकाशी दीपने (१९ षटकांत १/५९) ॲलेक्स कॅरीला माघारी धाडले.

अष्टपैलू रवींद्र जडेजाने (१४ षटकांत १/५४) झटपट धावा जमवणाऱ्या सॅम कोन्स्टासला पायचित केले. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला दुसऱ्यांदा नवा चेंडू घेण्याआधी गोलंदाजीला संधी दिली. ५ षटके फेकली असली तरी त्याला विकेट मिळवता आली नाही.

चौथ्या कसोटीचे पहिले सत्र न्यू साऊथ वेल्स येथील १९ वर्षीय पदार्पणवीर कोन्स्टासने गाजवले. तो दबाव झुगारून खेळत होता. त्याने बुमराला दोन षटकार लगावले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत कोन्स्टासची बाचाबाची झाली. कोहलीचा धक्का त्याला लागला आणि त्यातून या बाचाबाचीला तोंड फुटले.

२०२१ मध्ये कॅमेरॉन ग्रीनने लगावलेल्या षटकारानंतर बुमराला गुरुवारी प्रथमच कसोटीत षटकार मारला आहे. तीन वर्षांनंतर बुमराला कसोटीत षटकार लगावला आहे. कोन्स्टासने लॅप स्कूप फटका मारत षटकार लगावला.

कोहली-कोन्स्टास यांच्यातील संघर्षानंतर कोन्स्टासने लॅप स्कूप मारला. त्यानंतर त्याने रिवर्स लॅप स्कूपवर चौकार लगावला. त्यानंतर मिड ऑनवरून त्याने षटकार लगावला. एका बाजूने कोन्स्टासने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले असताना दुसऱ्या बाजूला अर्धशतक झळकावत ख्वाजा फॉर्ममध्ये आला आहे.

बुमराच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर ख्वाजाला टायमिंग करता आले नाही. त्यामुळे पुल करताना तो के. एल. राहुलच्या हातात झेल देऊन बसला. लंचनंतर ख्वाजा बुमराच्या गोलंदाजीवर बाद झाला.

या दोघांनी कमी चेंडूंत ८९ धावांची भागीदारी रचल्यामुळे लाबुशेन आणि शेवटच्या सामन्यातील शतकवीर स्मिथ यांनी फलंदाजीत संयम दाखवला.

ऑस्ट्रेलियन फलंदाज हाताबाहेर जात आहेत याची जाणीव झाल्याने कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजाला गोलंदाजीला आणले. त्याने सेट झालेल्या कोन्स्टासला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर ख्वाजा आणि लॅबुशेनने दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या. त्यासह आकाश दीपला दोन चौकार ठोकून ख्वाजाने मालिकेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले.

चार फलंदाजांची अर्धशतके

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या ४ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. त्यात पदार्पणवीर सॅम कोन्स्टास (६० धावा), उस्मान ख्वाजा (५७ धावा), मार्नस लाबुशेन (७२ धावा), स्टीवन स्मिथ (नाबाद ६८ धावा) या फलंदाजांचा समावेश आहे. या सांघिक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर तिनशे धावांचा टप्पा ओलांडला.

८७,२४२ एवढी विक्रमी प्रेक्षक संख्या

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मेलबर्नमधील स्टेडियममध्ये ८७,२४२ एवढी विक्रमी प्रेक्षक संख्या होती. सामन्याच्या दोन आठवडे आधीच या सामन्याची तिकीट विक्री झालेली होती. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांतील एका दिवसातील ही सर्वाधिक प्रेक्षक संख्या ठरली. पदार्पणवीर सॅम कोन्स्टासने पहिल्या सत्रात जसप्रित बुमराला मारलेल्या फटक्यांचे साक्षीदार हे प्रेक्षक झाले आहेत.\

बुमराची जादू कायम

पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले असताना शेवटच्या सत्रात मात्र बुमराची जादू चालली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी बुमराने ३ फलंदाजांना माघारी धाडले आहे. या तीन विकेट मिळून बुमराने मालिकेत आतापर्यंत २४ विकेट घेतल्या आहेत. मालिकेत सर्वाधिक विकेट बुमराच्याच खात्यात जमा आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या खात्यात प्रत्येकी १४ विकेट आहेत. तर मोहम्मद सिराजने १३ बळी मिळवले आहेत.

कोन्स्टासची विक्रमी खेळी

ऑस्ट्रेलियाचा युवा पदार्पणवीर सॅम कोन्स्टासने आपल्या या अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. या सामन्यात त्याने जसप्रीत बुमराला दोन षटकार लगावले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बुमराला दोन षटकार मारणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला. याआधी अशी कामगिरी इंग्लडचा सलामीवीर जोस बटलरने केली होती. जसप्रीत बुमराविरुद्ध कसोटीच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा कोन्स्टास हा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने बुमराचे ३३ चेंडू खेळत ३४ धावा केल्या. याशिवाय त्याने बुमराला एकूण ६ चौकार मारले. कसोटी क्रिकेटच्या एका डावात बुमराविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याआधी १७ वर्षे आणि ४० दिवस इतक्या कमी वयात इयान क्रेगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. १९५३ मध्ये मेलबर्नच्या खेळपट्टीवर त्याने ही कामगिरी केली होती.

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव ८६ षटकांत ३११ धावांवर ६ फलंदाज बाद (लाबुशेन ७२ धावा; सॅम कोन्स्टास ६० धावा, उस्मान ख्वाजा ५७ धावा, स्मिथ नाबाद ६८ धावा; जसप्रीत बुमरा ३/७५).

logo
marathi.freepressjournal.in