भारतावर मालिका गमावण्याची नामुष्की; १० वर्षांनी ऑस्ट्रेलियाने जिंकली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी; WTC च्या अंतिम फेरीसाठी कांगारू पात्र

मालिकेतील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य सहा विकेट राखून पूर्ण करत ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर बॉर्डर- गावस्कर मालिका खिशात घातली.
भारतावर मालिका गमावण्याची नामुष्की; १० वर्षांनी ऑस्ट्रेलियाने जिंकली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी; WTC च्या अंतिम फेरीसाठी कांगारू पात्र
एक्स @ICC
Published on

सिडनी : मालिकेतील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य सहा विकेट राखून पूर्ण करत ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर बॉर्डर- गावस्कर मालिका खिशात घातली. ५ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकत ऑस्ट्रेलियाने ११ ते १५ जून दरम्यान लॉर्ड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

डब्ल्यूटीसीचे विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावण्याची संधी ऑस्ट्रेलियाकडे आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रथमच भारताचा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत नसेल. भारताने दोन वेळा डब्ल्यूटीसीचे उपविजेतेपद पटकावले आहे.

पाठीच्या दुखापतीने त्रस्त जसप्रीत बुमरा जर रविवारी गोलंदाजीसाठी फिट असता तर ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे लक्ष्य गाठणे कठीण झाले असते. परंतु बुमराला सामना सोडावा लागल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ खेळत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला लक्ष्य गाठणे शक्य झाले.

पाच सामन्यांच्या मालिकेत ३२ विकेट घेणाऱ्या बुमराला मालिकावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले.

पराभवाने मला दु:ख झाले. पण काही वेळा तुम्हाला तुमच्या शरीराचा आदर करावा लागतो. तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू न शकल्याबाबत बुमरा व्यक्त झाला.

प्रसिद्ध कृष्णा ( १२ षटकांत ३/६५) आणि मोहम्मद सिराज (१२ षटकांत १/६९) यांनी बरेच खराब चेंडू टाकले. त्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाने केवळ २७ षटकांत ४ फलंदाज गमावून विजयी लक्ष्य गाठले.

उस्मान ख्वाजा (४१), ट्रॅविस हेड (नाबाद ३४ धावा) आणि पदार्पणवीर ब्यू वेबस्टर (नाबाद ३९ धावा) यांनी संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. या मालिकेत भारतीय फलंदाजांच्या चूका आणि बुमरावरचे अवलंबित्व उघड झाले.

सकाळी वॉर्मअप वेळी बुमराने गोलंदाजीचा सराव केला. मात्र त्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे रविवारी तो खेळू शकला नाही.

स्कॉट बोलंड (६/४५) आणि पॅट कमिन्स (३/४४) यांच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताचा पहिला डाव ३९.५ षटकांत १५७ धावांवर आटोपला. स्कॉट बोलंडला सामनावीर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. रिषभ पंतच्या ६१ धावा आणि यशस्वी जयस्वालच्या २२ धावा वगळता भारताच्या अन्य ९ फलंदाजांनी मिळून केवळ ७४ धावा जोडल्या.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांनी मालिकेत निराश केले. यशस्वी जयस्वालने मालिकेत भारताकडून सर्वाधिक ३९१ धावा केल्या. त्यानंतर युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने २९८ धावा जमवल्या. यष्टीरक्षक फलंदाज पंतने मालिकेत २५५ धावा जमविण्याची कामगिरी केली.

गौतम गंभीर प्रशिक्षक असताना भारताने या मोसमात १० पैकी सहा कसोटी गमावल्या आहेत. तसेच श्रीलंकेत वनडे मालिकेत पराभव पत्करला आहे.

बुमराची अनुपस्थिती अखेरच्या सामन्यात भारताला जाणवली. ग्लेन मॅग्राने सांगितल्याप्रमाणे, बुमराने ३२ विकेट घेतल्या नसत्या तर भारताला ऑस्ट्रेलियाने एकतर्फी पराभूत केले असते. ब्रिस्बेनमध्ये पावसामुळे भारताचा पराभव ट‌ळला. मोहम्मद सिराजला १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३६ कसोटी सामने खेळावे लागले.

खेळाडूने शरीराचा आदर करावा : बुमरा

पाठीच्या दुखापतीमुळे निर्णायक कसोटी अर्धवट सोडावी लागलेला भारताचा यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमरा म्हणाला की, कधी कधी खेळाडूने आपल्या शरीराचा आदर करावा. खेळात जास्त काळ खेळत राहणे, दबाव निर्माण करणे, दबाव झेलणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत. त्याचा फायदा संघाला भविष्यात होईल. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नितीशकुमार रेड्डी आणि हर्षित राणासारख्या युवा खेळाडूंना भविष्यात फायदेशीर ठरेल. पुढच्या वेळी ते आणखी ताकदीने खेळतील असे बुमरा म्हणाला. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ष २०२४ चा बेस्ट कसोटी संघ जाहीर केला. बुमराकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला या संघातून वगळण्यात आले आहे.

जबाबदारीपासून मी कधीही दूर जात नाही : गौतम गंभीर

धावांसाठी झटत असलेले स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात धावांची भूक आहे. त्यांच्यासह सर्व वरिष्ठ खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे असा सल्ला भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रविवारी दिला. खराब फॉर्ममुळे पाचव्या कसोटीतून बाहेर पडल्याबद्दल गंभीरने कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. जर एखाद्या कर्णधाराने हा निर्णय घेतला असेल तर मला वाटत नाही की त्यात काही चुकीचे आहे, असे गंभीर म्हणाले. बॉर्डर-गावस्कर मालिकेत काही चुका झाल्या आहेत त्या तुम्हाला मान्य आहेत का? असा सवाल करताच गंभीर म्हणाले की, मी जबाबदारीपासून कधीही दूर जात नाही.

ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित न केल्याने गावस्कर नाराज

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला ट्रॉफी देताना आमंत्रित न केल्याने भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. गावस्कर हे उपस्थित असूनही त्यांना न बोलावता केवळ बॉर्डर यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आल्याने गावस्कर नाराज झाले.

विजेत्या संघाला ट्रॉफी देताना मला आमंत्रित केले असते तर ते मला आवडले असते. कारण या मालिकेचे नाव बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे आहे. बक्षीस समारंभावेळी मी मैदानावर होतो. परंतु मी भारतीय असल्याने बहुदा मला नाकारले असावे. माझा जवळचा मित्र ॲलन बॉर्डरसोबत बक्षीस वितरण करता आले असते तर मला आनंद झाला असता, असे एका क्रीडा वाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की गावस्कर यांना माहित होते की, जर भारताने मालिका जिंकली असती तर त्यांच्या कर्णधाराला ट्रॉफी देण्यासाठी गावस्कर यांना आमंत्रित केले असते ही गोष्ट गावस्कर यांना माहीत होती, असा खुलासा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला आहे. बॉर्डर आणि गावस्कर या दोघांनाही बक्षीस देण्यासाठी बोलावले असते तर ते अधिक योग्य ठरले असते, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव : १८५ धावा; ऑस्ट्रेलिया पहिला डाव : १८१ धावा;

भारत दुसरा डाव : ३९.५ षटकांत १५७ धावांवर सर्वबाद (रिषभ पंत ६१, स्कॉट बोलंड ६/४५). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : २७ षटकांत ४ बाद १६२ (उस्मान ख्वाजा ४१, ट्रॅविस हेड नाबाद ३४ धावा, ब्यू वेबस्टर नाबाद ३९ धावा; प्रसिद्ध कृष्णा ३/६५).

logo
marathi.freepressjournal.in