वर्ष नवे, रडगाणे मात्र जुनेच! पाचव्या कसोटीतही भारतीय फलंदाजांची हाराकिरी कायम

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : गेल्या वर्षातील अखेरच्या लढतीत आलेले अपयश बाजूला सारून नव्या वर्षाची भारतीय संघ धडाक्यात सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती.
वर्ष नवे, रडगाणे मात्र जुनेच! पाचव्या कसोटीतही भारतीय फलंदाजांची हाराकिरी कायम
एक्स @ICC
Published on

सिडनी : गेल्या वर्षातील अखेरच्या लढतीत आलेले अपयश बाजूला सारून नव्या वर्षाची भारतीय संघ धडाक्यात सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून सुरू झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांचे जुने रडगाणे कायम राहिले. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान त्रिकुटापुढे भारतीय संघाचा पहिला डाव ७२.२ षटकांत १८५ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजांच्या कामगिरीवरच संघाची भिस्त असून त्यांनी पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ३ षटकांत १ बाद ९ अशी स्थिती केली आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणाऱ्या उभय संघांतील या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर १९ वर्षीय सॅम कोन्स्टास ७ धावांवर नाबाद आहे. मात्र त्याच्या अतिआक्रमकपणाचा फटका उस्मान ख्वाजाला बसला. कर्णधार जसप्रीत बुमराने दिवसातील अखेरच्या चेंडूवर ख्वाजाला (२) के. एल. राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. ख्वाजाला बाद केल्यानंतर बुमरासह संपूर्ण संघाने कोन्स्टासच्या दिशेने धाव घेत वेगळ्याच आवेशात जल्लोष केला. त्यामुळे आता शनिवारी भारताचे गोलंदाज कोन्स्टाससह अन्य ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडतील, हे निश्चित. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात अद्याप १७६ धावांनी पिछाडीवर आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत ही मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने कांगारूंना २९५ धावांनी धूळ चारली. मग दुसऱ्या लढतीत रोहित परतल्यावर गुलाबी चेंडूपुढे भारताची तारांबळ उडाली व ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांना १० गडी राखून नेस्तनाबूत केले. त्यानंतर पर्थ येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत अखेरच्या दिवसापर्यंत झुंज देऊनही भारताच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे कांगारूंनी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

आता स्वत: रोहितलाच पाचव्या कसोटीसाठी विश्रांतीच्या नावाखाली डच्चू देण्यात आल्याने पुन्हा बुमरा भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. रोहितच्या जागी शुभमन गिल, तर जायबंदी आकाश दीपच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरचे पदार्पण झाले. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्यासाठी ही लढत जिंकण्यासह अन्य संघांच्या कामगिरीवर विसंबून राहावे लागणार आहे. तूर्तास गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या, तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठलेली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मिचेल स्टार्कने पाचव्याच षटकात राहुलचा (४) अडसर दूर केला. मग स्कॉट बोलंडने मुंबईकर यशस्वी जैस्वालला (१०) चकवून भारताची २ बाद १७ अशी अवस्था केली. त्यानंतर मैदानावर गिल व विराट कोहली यांची जोडी जमली. या दोघांनी संथगतीने खेळ करताना तिसऱ्या विकेटसाठी १८ षटकांत ४० धावांची भर घातली. मात्र पहिल्या सत्रातील अखेरच्या षटकात नॅथन लायनला पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात गिल फसला व स्टीव्ह स्मिथने त्याचा २० धावांवर झेल टिपला.

३ बाद ५७ धावांवरून दुसऱ्या सत्राला प्रारंभ करताना विराट व ऋषभ पंतवर चाहत्यांचे लक्ष होते. तब्बल ६८ चेंडू एकही चौकार न लगावता खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या विराटचा बचाव अखेर ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूनेच भेदला. ६९ चेंडूंत १७ धावा करणाऱ्या विराटचा बोलंडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या वेबस्टरने उत्तम झेल घेतला. या मालिकेत जवळपास ५ ते ६ वेळा विराट स्लीपमध्ये अथवा यष्टिरक्षकाकडे झेल देत माघारी परतला आहे. यानंतर पंत व रवींद्र जडेजाच्या जोडीने चहापानापर्यंत पडझड होऊ न देता भारताला ५० षटकांत ४ बाद १०७ धावांपर्यंत नेले.

तिसऱ्या सत्रात मात्र बोलंडने पुन्हा एकदा कमाल करताना एकाच षटकात भारताला दोन धक्के दिले. प्रथम त्याने पंतला बाऊन्सर टाकून ४० धावांवर बाद केले. पंत व जडेजाने पाचव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. मग पुढच्याच चेंडूवर मेलबर्नचा शतकवीर नितीश रेड्डीचा शून्यावरच बोलंडने अडसर दूर केला. स्टार्कने मग जडेजाला २६ धावांवर पायचीत पकडले. वॉशिंग्टन सुंदरला (१४) बाद देण्यावरून आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले. ८ विकेट गेल्यावर बुमराने पुढाकार घेत ३ चौकार व १ षटकारासह १७ चेंडूंत २२ धावा फटकावल्या. त्याने अखेरच्या दोन विकेटसाठी कृष्णा व मोहम्मद सिराजसह उपयुक्त भागीदारी रचून संघाला पावणेदोनशे धावांपलीकडे नेले. अखेर पॅट कमिन्सने बुमराला बाद करून भारताचा डाव १८५ धावांवर गुंडाळला. कांगारूंकडून बोलंडने ४, स्टार्कने ३, तर कमिन्सने २ बळी मिळवले. शनिवारी भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ होईल.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ७२.२ षटकांत सर्व बाद १८५ (ऋषभ पंत ४०, रवींद्र जडेजा २६, जसप्रीत बुमरा २२; स्कॉट बोलंड ४/३१)

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३ षटकांत १ बाद ९ (सॅम कोन्स्टास नाबाद ७, उस्मान ख्वाजा २; जसप्रीत बुमरा १/७)

बुमरा-कोन्स्टास यांच्यातील शाब्दिक चकमकीचा ख्वाजाला फटका

दिवसातील अखेरच्या काही मिनिटांत फलंदाजी करण्याची वेळ आल्याने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आधीच काहीसे हताश दिसले. त्यातच बुमरा आग ओकणारी गोलंदाजी करत असल्याने दोन्ही फलंदाज सातत्याने वेळकाढूपणा करत होते. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असताना जवळपास १.३० मिनिटे बाकी होती. ख्वाजाने मात्र हे हेरले व काहीसा वेळ दवडला. त्याच वेळी बुमराने पंचांना ही बाब लक्षात आणून दिली. मात्र यावेळी नॉन स्ट्राइकवरील कोन्स्टास बुमराला उद्देशून काहीतरी म्हणाला. त्यामुळे बुमरानेही त्याला प्रत्युत्तर दिले. अखेर बुमराने ख्वाजाला बाद केले व कोन्स्टासच्या दिशेने रागाच्या आवेशात धाव घेतली. मात्र वेळीच स्वत:ला रोखले. विराट, गिल, नितीश, कृष्णा यांनीही कोन्स्टासमोर येऊन जल्लोष केला. येथेच पंचांनी खेळ संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शनिवारी कोन्स्टास विरुद्ध बुमरा यांच्यातील जुगलबंदी पाहण्यासाठी चाहत्यांना भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता उठायला लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in