

मेलबर्न : वरच्या फळीतील फलंदाजांनी धावा न केल्यामुळे अन्य फळीतील फलंदाजांवर दबाव येतो. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल, असे मत भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने व्यक्त केले. एमसीजी येथे तो पत्रकारांशी संवाद साधत होता.
ब्रिस्बेन येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जडेजाने शानदार फलंदाजी केली. त्याने ७७ धावांची खेळी खेळल्यामुळे भारताला हा सामना ड्रॉ करता आला. पावसामुळे या सामन्यातील बरेच सत्र वाया गेले होते.
भारताबाहेर खासकरून ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका येथे खेळताना वरच्या फळीतील फलंदाजांनी जमवलेल्या धावा फारच महत्त्वाच्या असतात. वरच्या फळीतील फलंदाजांनी धावा न केल्यास धावा जमवण्याची जबाबदारी आणि दवाव अन्य फलंदाजांवर येतो, असे जडेजा म्हणाला.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाज धावा जमवतील अशी आशा करूया. वरच्या फळीतील फलंदाजांनी धावा जमवणे ही संघाची गरज आहे. प्रत्येक फलंदाजाने आपले योगदान दिल्यास संघाला त्याचा फायदा होईल. ब्रिस्बेन येथील सामन्यात केएल राहुल (८४ धावा) वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांना धावा जमवण्यात अपयश आले. परंतु मालिकेतील पहिल्याच सामन्यात खेळलेल्या जडेजाने चांगली खेळी खेळली. अखेरीस जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्यातील शेवटच्या विकेटच्या भागीदारीमुळे सामना वाचला, असे जडेजा म्हणाला.
पहिले दोन सामने न खेळणे माझ्या फायद्याचे ठरले. कारण या वेळात मला वातावरणाशी जुळवून घेता आले. मला ऑस्ट्रेलियातील परिस्थिती समजून घेण्यासाठी काही दिवस मिळाले. मी येथे गोलंदाजी आणि फलंदाजीचा कसून सराव केला, असे जडेजा म्हणाला. जडेजा पुढे म्हणाला की, मालिकेतील तीन कसोटी सामन्यांनंतर दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. त्यामुळे पुढचे दोन्ही सामने इंटरेस्टींग असतील. यातील एक सामना जरी भारताने जिंकला तरी मालिका भारताच्या खिशात जाईल. कारण आम्ही शेवटच्या दोन मालिका जिंकल्या आहेत.
मालिकेतील चौथा सामना भारतासाठी महत्त्वाचा आणि तितकाच निर्णायक आहे. शेवटच्या सामन्यातले नंतर पाहता येईल. हा सामना भारतासाठी चांगली संधी आहे. नेटमधील सरावामुळे मला मालिकेतील तिसऱ्या सामन्यात फायदा झाला. ज्याप्रमाणे ठरवले होते त्यानुसार मी खेळलो. भारताने पर्थ येथे २९५ धावांनी मोठा विजय मिळवला होता. परंतु दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली, असे जडेजा म्हणाला. रविचंद्रन अश्विनने निवृत्तीचा घेतलेला निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. पत्रकार परिषदेच्या ५ मिनिटे आधी मला अश्विनच्या निवृत्तीची माहिती मिळाली, असेही त्याने सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील ३ सामने झाले आहेत. जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले. त्यांनी भारताचा पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. तिसऱ्या सामन्यात पावसाने बराच खेळ वाया घालवला. या सामन्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली. हा सामना भारताच्या हातून सुटतो की काय अशीच शंका होती. मात्र पावसाने वेळीच लावलेली हजेरी आणि भारताच्या अखेरच्या जोडीने केलेल्या महत्त्वपूर्ण धावा यामुळे हा मालिकेतील तिसरा सामना अनिर्णित राहिला. दरम्यान मालिकेतील आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांत भारताच्या प्रमुख फलंदाजांना धावा जमवण्यात अपयश आले आहे. त्याचा फटका भारताला बसला आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत फलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा आहेत. या सामन्यात फलंदाजांना धावा जमवाव्या लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय गोलंदाजांविरुद्ध माझ्याकडे योजना : सॅम कोन्स्टास
मेलबर्न भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध माझ्याकडे काही योजना आहेत. संधी मिळाल्यास मी त्याचा अवलंब करेन, असे ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कोन्स्टास म्हणाला. बॉर्डर गावस्कर मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू व्यक्त झाला. भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. खासकरून नॅथन मॅकस्विनीला धावा जमवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांतून त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज सॅम कोन्स्टासला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भारतीय गोलंदाजांविरुद्ध माझ्याकडे काही प्लान्स आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघात संधी मिळेल अशी मला आशा आहे. मी माझ्या फलंदाजीने गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करेन, असे हा युवा फलंदाज म्हणाला. कोन्स्टास हा १९ वर्षांचा आहे. भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाल्यास पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वात तरुण कसोटी पदार्पणवीर ठरेल.
हेडमध्ये शॉर्ट बॉल लवकर ओळखण्याची क्षमता
मेलबर्न: शॉर्ट बॉलला लवकर ओळखून फटकवण्याची ट्रॅव्हिस हेडमध्ये असलेली क्षमता हेच बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाला फायदेशीर ठरत असल्याचे मत माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. तसेच हीच भारतासाठी oppo डोकेदुखी असल्याचे शास्त्री म्हणाले. मला वाटते की हेड हा प्रचंड हुशार आहे. तीन वर्षांपूर्वी मी त्याला खेळताना पाहिले होते. मात्र आता त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. खासकरून तो शॉर्ट बॉल चांगल्या प्रकारे खेळत आहे. चेंडूला लवकर ओळखण्याच्या क्षमतेमुळे त्याला योग्य स्ट्रोक खेळण्यासाठी वेळ मिळतो, असे शास्त्री म्हणाले.