जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा : बसंतची रौप्यभरारी!

जागतिक युवा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (२० वर्षांखालील) भारताच्या बसंत कुमार मेघवालने उंच उडीत रौप्य, तर शाहनवाझ खानने पुरुषांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत उंच उडी आणि लांब उडी या दोन्ही क्रीडाप्रकारांत पदक जिंकणारे हे दोघे पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत.
जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा : बसंतची रौप्यभरारी!
जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा : बसंतची रौप्यभरारी!
Published on

यूजीन : जागतिक युवा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (२० वर्षांखालील) भारताच्या बसंत कुमार मेघवालने उंच उडीत रौप्य, तर शाहनवाझ खानने पुरुषांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत उंच उडी आणि लांब उडी या दोन्ही क्रीडाप्रकारांत पदक जिंकणारे हे दोघे पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत.

राजस्थानच्या अनुपगढ जवळील १२ ए-बी या सीमावर्ती गावातील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय बसंत याने २.२१ मीटर उंच उडी मारून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदकावर नाव कोरले. अल्जेरियाच्या युनेस अयाची याने सुवर्ण, तर ब्रिटनच्या ओटिस पूल याने कांस्यपदक मिळवले. तिन्ही खेळाडूंनी २.२१ मीटरची उंची पार केली होती; मात्र २.२४ मीटरचा टप्पा ओलांडण्याचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरल्याने आधीच्या प्रयत्नांच्या संख्येवरून जेतेपद निश्चित करण्यात आले. भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या बसंतला भारताची माजी राष्ट्रीय विक्रमवीर सहाना कुमारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचे शेतकरी वडील गंगाराम मेघवाल हे ड्रायव्हर आणि रोजंदारी मजूर म्हणूनही काम करतात.

भारताची या स्पर्धेतील एकूण पदकांची संख्या तीनवर पोहोचली असून, शुक्रवारी आशिष यादव याने भालाफेकीत रौप्यपदक जिंकले होते. यासह भारताने २०२१ आणि २०२२ च्या आवृत्तीतील एकूण तीन पदकांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे. २००२ ते २०२८ दरम्यान भारताने या स्पर्धेत एकूण चार पदके जिंकली होती, ज्यामध्ये नीरज चोप्रा आणि हिमा दास यांच्या सुवर्णपदकांचा समावेश होता, तर २०२४ मध्ये भारताने एक पदक जिंकले होते.

इतर क्रीडाप्रकारांत भारतीय महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने ३ मिनिटे ३९.५३ सेकंद वेळेसह आपल्या हीट शर्यतीत तिसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. या संघात भूमिका नेहाते, तहुरा खातून, तनू चौधरी आणि थिया अरुमुगम यांचा समावेश आहे. मात्र, महिलांची ४ बाय १०० मीटर रिले टीम आणि पुरुषांचा ४ बाय ४०० मीटर रिले संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. पुरुषांच्या थाळीफेकमध्ये निश्चय फोगट ५९.४६ मीटर फेकीसह १६ व्या स्थानावर राहिल्याने बाहेर पडला. पुरुषांच्या ५००० मीटर रेस वॉक अंतिम फेरीत नितीन गुप्ता १९ मिनिटे ३२.३० सेकंद वेळेसह सहाव्या स्थानावर राहिला. मात्र तूर्तास भारतीय क्रीडापटू या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहेत.

लांब उडीत भारताच्या शाहनवाझला कांस्य

उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील मढईपूर गावच्या १८ वर्षीय शाहनवाझ खान याने ७.८४ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक पटकावले. शाहनवाझने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर त्याची संपूर्ण मालिका ७.६७ मी, ७.७२ मी, ७.८४ मी, ७.५२ मी, ७.८३ मी आणि ५.३७ मी अशी राहिली. या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेला दुसरा भारतीय खेळाडू जितिन अर्जुनन ७.५९ मीटर उडी मारून आठव्या क्रमांकावर राहिला. इटलीच्या डॅनिएल इनझोली याने ७.९७ मीटरसह सुवर्ण आणि ऑस्ट्रेलियाच्या मेसन मॅकग्रोडर याने ७.९६ मीटरसह रौप्यपदक जिंकले. शाहनवाझच्या वडिलांचे २०१८ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते.

पदक विजेत्यांनी घेतली मोदींची भेट

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्व पदकविजेत्यांनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुख पी. टी. उषादेखील उपस्थित होत्या. भारताने राष्ट्रकुलमध्ये ३९ पदके कमावली. यामध्ये १३ सुवर्ण, १७ रौप्य, ९ कांस्यपदकांचा समावेश होता. आता २०३०मध्ये भारतातील अहमदाबाद येथे राष्ट्रकुलचे आयोजन करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in