पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील भीष्मपितामह मधुकर दरेकर यांचे निधन

शरीरसौष्ठव आणि व्यायामक्षेत्रात एक आदरणीय आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून दरेकरांना ओळखले जात होते.
पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील भीष्मपितामह मधुकर दरेकर यांचे निधन

पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील भीष्मपितामह म्हणून ओळखले जाणारे व्यायाममहर्षी मधुकर दरेकर यांचे त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठवात हजारो खेळाडू त्यांनी तयार केले. त्यांच्या या योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही गौरवले होते.

शरीरसौष्ठव आणि व्यायामक्षेत्रात एक आदरणीय आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून दरेकरांना ओळखले जात होते. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी आपल्या शिष्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करीत शरीर सुदृढ राखण्यासाठी मार्गदर्शन केले होते. मुंबईतील ग्लॅक्सो लॅबोरेटरीजमध्ये ३४ वर्षे सेवा केल्यावर दरेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत स्वतःचे अवघे आयुष्य व्यायाम, पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव क्षेत्राच्या विकासासाठी समर्पित केले होते. जवळपास ६० वर्षे व्यायामक्षेत्रात मुशाफिरी करत त्यांनी देशाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळवून देणारे अनेक खेळाडू घडवले. १९८३ मध्ये प्रथमच महिलांना पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग प्रशिक्षण देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला होता. त्याचेच फलित म्हणून आज महाराष्ट्राच्या अनेक महिला पॉवरलिफ्टर्स जगभरात देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. महानगरपालिका शाळांमध्ये मोफत प्रशिक्षण देण्याच्या दरेकर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in