भुवनेश्वर कुमारची शेवटच्या षट्कांमधील कामगिरी ही भारतासाठी चिंतेची बाब - सुनील गावसकर

भुवनेश्वरने गेल्या काही सामन्यांतील शेवटच्या षट्कांमध्ये धावांची अक्षरश: खैरात केली.
 भुवनेश्वर कुमारची शेवटच्या षट्कांमधील कामगिरी ही भारतासाठी चिंतेची बाब -  सुनील गावसकर

‘‘पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची शेवटच्या षट्कांमधील खराब कामगिरी ही भारतासाठी चिंतेची बाब आहे’’, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

भुवनेश्वरने गेल्या काही सामन्यांतील शेवटच्या षट्कांमध्ये धावांची अक्षरश: खैरात केली. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने १९ व्या षट्कात १६ धावा बहाल केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २०९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

गावसकर यांनी स्पोर्ट्स टुडेला मुलाखत देताना सांगितले की, “मोहालीच्या खेळपट्टीवर जास्त दव होते, असे मला वाटत नाही. क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाज बोटे सुकविण्यासाठी रुमाल वापरताना दिसले नाहीत. त्यामुळे दव हे कारण बिलकूल असू शकत नाही. भारतीयांनी प्रभावी गोलंदाजी केली नाही. एकोणिसाव्या निणार्यक षट्कातील गोलंदाजी हीच खरी चिंतेची बाब आहे. ’’

ते पुढे म्हणाले, “जेव्हा भुवनेश्वर कुमारसारख्या गोलंदाजाकडे चेंडू सोपविला जातो, तेव्हा प्रतिस्पर्धी फलंदाज प्रत्येक वेळी धावा काढण्याच्या मानसिकतेत असतो. भुवनेश्वरने पाकिस्तान, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांविरुद्धच्या सामन्यांमध्ये १८ चेंडूत ४९ धावा बहाल केल्या.

गावसकर यांनी सांगितले की, “सरासरी काढायची झाल्यास एका चेंडूवर सुमारे तीन धावा देणे इथपर्यंत ठीक असते; पण त्याही खूप जास्त होतात. त्याच्यासारखा अनुभवी आणि क्षमता असलेल्या गोलंदाजाकडून १८ चेंडूत ३५ ते ३६ धावा दिल्या जात असतील तर ते चिंताजनक आहे.”

ते म्हणाले की, “भारताला चांगल्या धावसंख्येचाही बचाव करता आला नाही; परंतु जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे गोलंदाजीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.”

बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षट्कांच्या मालिकेपासून बाहेर आहे. याबाबत गावसकर म्हणाले, “भारताला गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात थोड्याफार प्रमाणात फटका बसला आहे. मोठ्या धावसंख्येचा बचाव करण्यातही भारताला अपयश आले. बुमराह येतो तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. कारण तो सलामीवीरांना बाद करतो. मंगळवारी ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केल्याने भारताला अपेक्षित यश मिळाले नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in