टेनिस विश्वाला मोठा धक्का; सेरेना विल्यम्सने दिले निवृत्तीचे संकेत

सेरेनाने तिच्या कारकीर्दीत २३ ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदे पटकाविली आहेत.
 टेनिस विश्वाला मोठा धक्का; सेरेना विल्यम्सने दिले निवृत्तीचे संकेत

महिलांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम असलेल्या सेरेना विल्यम्सने मंगळवारी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. टेनिस विश्वातील मानाच्या अमेरिकन ओपन ग्रॅडस्लॅम स्पर्धेनंतर ती टेनिसला अलविदा करणार असल्याचे समोर येत आहे. टेनिस विश्वाला यामुळे एक मोठा धक्का बसला.

सेरेना ३६५ ग्रँडस्लॅम सामने जिंकून महिलांमध्ये अव्वल स्थानावर आहे. सेरेनाने तिच्या कारकीर्दीत २३ ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदे पटकाविली आहेत. मार्गारेट कोर्टच्या नावावर सर्वात जास्त २४ जेतेपदे आहेत. तरीही सेरेनालाच सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मानली जाते. कारण तिने आपल्या खेळाने महिला टेनिसला नवा दर्जा दिला आहे.

टेनिस विश्वात ब्लॅक ब्यूटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सेरेनाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘‘आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागण्याची आयुष्यात एक वेळ यातच असते. आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करीत असतानाच ती गोष्ट आपल्याला सोडण्याची वेळ येण्याचा क्षण नेहमीच कठीण असतो. मी नेहमीच टेनिसचा आनंद घेते; मात्र आता माझा परतीचा प्रवास सुरू झाल्यासारखे वाटते.’’

तिने स्पष्ट केले की, ‘‘मी आता आई झाले आहे. त्यामुळे आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आता काही गोष्टींना प्राधान्य द्यायचे मी ठरविले आहे. तरीसुद्धा पुढील काही आठवडे मी टेनिसचा मनमुराद आनंद लुटणार आहे.’’

सेरेनाने आपला एक दबदबा निर्माण केला आहे. सेरेना पुरुष टेनिसपटूंबरोबर उतरली तर ती त्यांनाही पराभूत करू शकेल, असे तिचे चाहते म्हणत असतात. टेनिस कोर्टवर जोरदार फटक्यांसाठी ती प्रसिद्ध होती. सेरेनाची बहीण व्हीनसदेखी टेनिसपटूच होती; पण व्हीनसपेक्षा सेरेनाने जास्त सामने जिंकले आणि टेनिस विश्वात आपले निर्विवाद वर्चस्व राखले.

महिलांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा (३६५ ग्रँड स्लॅम) विश्वविक्रम सेरेनाच्या नावावर आहे. त्यानंतर महिलांमध्ये दुसऱ्या स्थानावर मार्टिना नवरातिलोव्हा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in